चांगल्या वाचनामुळे माणसावर चांगले संस्कार होतात. त्यामुळे संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पुस्तके आणि साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले.
महाराष्ट्र साहित्य व संस्कृती महामंडळाने प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित केलेल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार आणि उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, राज्य विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड आदी उपस्थित होते. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना प्रदान करण्यात आला.
पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर श्री. पु. भागवत सवरेत्कृष्ट प्रकाशकाचा पुरस्कार मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असा आहे.
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी साह्िित्यकांनी दिलेले योगदान मोठे असून मराठीत साहित्यात विविध प्रकारातील लेखन झाल्यामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. लोकसाहित्य आता मौखिक परंपरेबरोबरच लिखित स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे तो महत्त्वाचा दस्तावेज ठरला असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, इंटरनेट, भ्रमणध्वनी, दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड होते. हे काही प्रमाणात खरे असले तरी मराठी पुस्तकांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असून विविध विषयांवरील पुस्तकेही प्रकाशित होत आहेत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना महानोर म्हणाले की, ज्या यशवंतराव चव्हाण यांच्या सान्निध्यात मी वाढलो, वावरलो, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत विंदांसारख्या मोठय़ा कवींच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळणे हा योग आनंद देणारा आहे. मी हा पुरस्कार शेतकरी आणि अन्न पिकविणाऱ्या भूमीला अर्पण करतो. मी मूळचा शेतकरी असल्याने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात.
या वेळी राज्य शासनाच्या सवरेत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. कथा, कविता, प्रवासवर्णन आदी विविध गटांतील ४२ पुरस्कार लेखकांना प्रदान केले गेले.