प्रस्तावित शुल्कवाढ कमी करण्याचा पालिकेचा निर्णय

पर्यावरण कार्यकर्त्यांचा विरोध व नंतर राजकीय मुद्दा बनवण्यात आलेली भायखळा प्राणिसंग्रहालयाची प्रस्तावित शुल्कवाढ १०० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. लहान मुलांसाठी २५ रुपये तर चौघांच्या कुटुंबांना १०० रुपयांचे शुल्क लागू होणार असून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीमार्फत व ज्येष्ठ तसेच अपंग नागरिकांना नि:शुल्क प्रवेश दिला जाईल. त्याच वेळी सकाळी फिरायला येणाऱ्यांचे मासिक शुल्क ३० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे.

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विनचा कक्ष सुरू झाल्यानंतर या कक्षाची देखभाल तसेच उद्यानाच्या इतर विकासकामांचा खर्च काही प्रमाणात भरून निघावा यासाठी पालिका प्रशासनाकडून जानेवारीमध्ये उद्यानाच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्यात आला. मात्र निवडणुका व शाळांच्या परीक्षांनंतर येणाऱ्या काळात लगेचच ही वाढ होऊ नये यासाठी शिवसेनेने हा प्रस्ताव मागे ठेवला. त्यानंतर मेमध्ये बाजार व उद्यान समितीत हा प्रस्ताव मान्य झाल्यावर स्थायी समितीत शुक्रवारी या विषयावर चर्चा झाली. या प्रस्तावानुसार १२ वर्षांवरील सर्वाना १०० रुपये, लहान मुलांना २५ रुपये, चौघांच्या कुटुंबाला १०० रुपये लावणे अपेक्षित होते. मात्र १२ वर्षांवरील व्यक्तींकडून १०० रुपयांऐवजी ५० रुपये तसेच कुटुंबासोबत आलेल्या पाचव्या व्यक्तीलाही ५० रुपये शुल्क लावले जावे अशी उपसूचना सभागृहनेता यशवंत जाधव यांनी मांडली. या उपसूचनेसह हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.

१ जूनपासून लागू होणारे शुल्क

’ १२ वर्षांवरील व्यक्ती – ५० रुपये (५ रु.)

’ ३ ते १२ वयोगटांतील मुले – २५ रुपये (२ रु.)

’ दोन प्रौढ व दोन मुले – १०० रुपये

’ ज्येष्ठ तसेच अपंग – नि:शुल्क (नि:शुल्क)

’ सकाळच्या फेरफटक्याचे मासिक शुल्क – १५० रुपये (३० रु) (कंसात आधीचे शुल्क)