प्रसिद्ध निर्माती एकता कपूरचा सतत पाठलाग केल्याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलिसांनी ३२ वर्षीय इसमाला अटक केली आहे. सुधीर सिंग असं आरोपीचं नाव असून तो मूळचा हरयाणाचा आहे. काम मिळवण्यासाठी तो एकता कपूरचा पाठलाग करत असल्याची माहिती समोर येत आहे.

‘डीएनए’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सुधीर सिंग हा एका टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीत काम करत होता. गेल्या महिन्याभरापासून तो एकताला भेटण्याचा प्रयत्न करत होता. एकताने त्याला अनेकदा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी तो सतत तिचा पाठलाग करत होता.

‘काही दिवसांपूर्वी जेव्हा एकता जुहू इथल्या एका मंदिरात गेली, तेव्हा सुधीरला त्या मंदिराच्या आसपास पाहिलं गेलं. त्याने एकताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षारक्षकांनी त्याला रोखलं,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार एकता कपूर अंधेरीतल्या ज्या जिममध्ये जाते, त्या जिमचं सदस्यत्वसुद्धा त्याने घेतलं आहे. त्याला अनेकदा जिमच्या आसपास पाहिलं गेलं. सुधीरने एकदा जिममध्ये एकताशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिथेसुद्धा त्याला सुरक्षारक्षकांनी रोखलं. अखेर पाठलाग करण्याची तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.

‘काही सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. एकता कपूर कुठे आणि कधी फिरायला जाते याची अचूक माहिती सुधीर सिंगला कशी मिळायची याचाही तपास पोलीस करत आहेत.