कल्याण पूर्वेतील राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आमदार व तिसाई केबलचे मालक आमदार गणपत गायकवाड यांनी शनिवारी रात्री वीस ते पंचवीस जणांसह जाऊन एका केबलचालकावर रिव्हॉल्व्हर रोखून त्याला मारहाण केल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. कल्याण पूर्व येथे सेट टॉप बॉक्स
बसविण्याचे काम स्थानिक केबलचालक किरण सोपानराव निचळ करीत आहेत. या बॉक्सच्या दरावरून केबलचालकांमध्ये वाद सुरू आहेत. निचळ यांच्या तिसगाव
येथील घरी आमदार गायकवाड व त्यांचे सहकारी शाम शेळके, दत्ता गायकवाड, मनोज माळी, अभिमन्यू गायकवाड व इतर २५ जण गेले. सेट टॉप बॉक्ससाठी तू आठशे ते एक हजार रुपयांऐवजी बाराशे ते पंधराशे रुपये का घेत नाहीस, अशी विचारणा आमदार गायकवाड यांनी निचळना केली. निचळ आणि गायकवाड गटांत बोलाचाली सुरू झाली. हे दर आपण ठरवू शकत नाहीत, असे निचळ यांनी सांगताच गायकवाड गटाने निचळ यांना मारहाण केली. आमदार गायकवाड व अंगरक्षक
शेळके यांनी त्या वेळी जवळील रिव्हॉल्व्हर आपल्यावर रोखले, असे निचळ यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आमदार गायकवाड यांनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. ते म्हणाले, की निचळ हे आमचे केबलचालक आहेत. त्यांना समजाविण्यासाठी आपण त्यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी आपले रिव्हॉल्व्हर घरी होते. तेव्हा रिव्हॉल्व्हर रोखण्याचा प्रश्नच नसून अभिमन्यू गायकवाड हे तर तेव्हा घटनास्थळीही नव्हते.