* क्लासचालकांना अनुभवी शिक्षक मिळेनात
* हैदराबाद, कोटामधील शिक्षकांवर पैशांचा पाऊस
‘एमएचटी-सीईटी’ची जागा राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई-मेन्स’ किंवा ‘नीट’ या परीक्षांनी घेतल्यामुळे क्लासचालकांना उपयुक्त पुस्तकांबरोबरच अनुभवी शिक्षकांचीही कमतरता भासत आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना थेट कोटा, तसेच हैदराबाद येथून लाखो रुपयांची (प्रसंगी एक-दीड कोटीची) पॅकेजेस देऊन महाराष्ट्रात ‘आयात’ करण्याचा मार्ग क्लासचालकांनी पत्करला आहे. त्यांच्या मानधनाचा बोजा थेट विद्यार्थ्यांवरच पडत आहे.   
शिकवणी वर्गातील सर्वसाधारण शिक्षकाला प्रतितास मेहनताना दिला जातो. साधारणत ६०० ते एक हजार रुपये प्रतितास असे त्यांचे मानधन असते. या दरानुसार प्रत्येक शिक्षकाचे महिन्याचे शिकवणी वर्गातून येणारे उत्पन्न एक ते दीड लाखाच्या आसपास जाते. सीबीएसईच्या धर्तीवर विस्तारलेला बारावीचा अभ्यासक्रम आणि जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या अनुभवी व पात्र शिक्षकांचे प्रमाण राज्यात खूपच कमी आहे. त्यामुळेच शिक्षकांना वर्षांचे पॅकेज ठरवून देण्याची वेळ क्लासचालकांवर आली आहे. ही पॅकेजेस वार्षिक किमान २६ लाखांपासून कमाल दीड कोटीच्या घरात आहेत. याशिवाय कोटा, हैदराबाद येथून येणाऱ्या काही शिक्षकांची राहण्याची सोयही क्लासचालकांना करावी लागते. त्यामुळेच या क्लासच्या शुल्कात प्रचंड वाढ झाल्याचे दिसते.

      अकरावी-बारावीचा विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम प्रचंड वाढला आहे. त्यामुळे, आधीच्या तुलनेत दुप्पट तास घेऊन क्लासवाल्यांना शिकवावे लागत आहेत. उदाहरणार्थ रसायनशास्त्रासाठी आता २०० वर्ग घ्यावे लागतात. त्यामुळे, शिक्षकांची गरजहीवाढली आहे, पण क्लासचालकांची गरज भागवू शकतील इतके शिक्षक सध्या उपलब्ध नसल्याने मोठी अडचण झाली आहे. – नरेंद्र बांबवानी, रिलायबल क्लासेस

      शिक्षक निवडताना आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. उत्तर भारतातून असल्यामुळे ते हिंदी फार बोलतात. त्यामुळे आम्ही त्यांची सुरुवातीला लेखी परीक्षा घेतो. त्यानंतर मुलाखत, वर्गात शिकवितानाचे प्रात्यक्षिक अशा टप्प्यातून आम्ही त्यांचे विषयाचे ज्ञान, इंग्रजीतून संभाषण तपासतो. त्यानंतरच त्यांच्याशी करार करतो. त्यामुळे, एखादा शिक्षक जरी चांगला असेल तरी केवळ इंग्रजीतून संभाषण करता येत नाही, म्हणून त्याला नाकारले जाऊ शकते.     – प्रवीण त्यागी, आयआयटीयन्स-पेस