मुंबई : देशभरात वाढत्या झळांमुळे वीजमागणीत प्रचंड वाढ झाल्यानंतर ती भागवण्यासाठी विविध राज्यांनी मोठय़ा प्रमाणात खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू केल्याने बाजारातील दर १८ ते २० रुपयांवर गेल्याची गंभीर दखल घेत केंद्रीय वीज आयोगाने खुल्या बाजारातील वीजदरांवर कमाल १२ रुपये प्रति युनिट अशी मर्यादा घातली आहे. त्यामुळे वीज बाजारातील अनिर्बंध नफेखोरीला थोडा आळा बसणार आहे. महाराष्ट्राला २ हजार मेगावॉट वीज खुल्या बाजारातून घ्यावी लागत होती हे पाहता या निर्बंधामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

मार्च महिन्यातच मे महिन्यासारखा उन्हाचा त्रास सुरू झाला आहे. विविध राज्यांत वीजमागणी प्रचंड वाढली. महाराष्ट्राचा विचार करता मुंबईसह वीजमागणी विक्रमी २८ हजार मेगावॉटपर्यंत गेली होती. इतर राज्यांतही वीजमागणी वाढली. पण याच काळात कोळशाचा पुरेसा पुरवठा कोल इंडियाकडून न झाल्याने राज्यांचे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यास असमर्थ ठरू लागले. पुरेसा कोळसा नसल्याने देशातील ४ हजार मेगावॉट क्षमतेचे औष्णिक वीज प्रकल्प बंद होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत कोल इंडियाने या वर्षी १५ दशलक्ष टन जास्त कोळसा पुरवठा केला असला तरी वीजमागणीतील वाढीचा वेग जास्त असल्याने वीज प्रकल्पांची कोळशाची गरज वाढली आहे. त्याच वेळी आयात कोळशाचे दर प्रचंड वाढल्याने त्याचा वापर कमी करण्यात आला आहे. त्यातून स्थानिक कोळशाच्या मागणीत वाढ होत आहे.

या सर्व परिस्थितीत खुल्या बाजारातील वीजदरात वेगाने वाढ सुरू झाली. महाराष्ट्राने मार्चच्या सुरुवातीला ६०० ते ८०० मेगावॉट वीज खुल्या बाजारातून खरेदी केली. वाढत्या वीजमागणीमुळे मार्चच्या अखेरीस ते प्रमाण २ हजार मेगावॉटपर्यंत वाढले. खुल्या बाजारातील निम्मी वीज महाराष्ट्र व गुजरात घेत होते. तशात वीजमागणी आणखी वाढू लागल्याने कमाल वीजमागणीच्या काळात १८ रुपयांपर्यंत खुल्या बाजारातील वीजदर गेले. त्यामुळे ही अनिर्बंध दरवाढ रोखण्यासाठी केंद्रीय वीज नियामक आयोगाने खुल्या बाजारातील वीजदरांवर १२ रुपये प्रति युनिटची मर्यादा घातली आहे. पण केवळ तेच करून चालणार नाही. राज्यांच्या वीजनिर्मिती केंद्रांना पुरेसा कोळसा मिळून सरकारी वीजनिर्मिती वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर वीजखरेदी करारांच्या माध्यमातून राज्यांना वीजविक्री करणाऱ्या खासगी वीजकंपन्यांची वीजनिर्मिती वाढेल याचेही प्रयत्न झाले पाहिजेत, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले.