एक्स्प्रेस गाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे शनिवारी दुपारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या वारंवार होणाऱ्या खोळंब्यामुळे कालच बदलापूर स्थानकात प्रवाशांचा संतापाचा कडेलोट झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेची ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती पाहायला मिळाली. सँडहर्स्ट रोड ते मस्जिद बंदर या स्थानकांदरम्यान काहीवेळापूर्वी सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. त्यामुळे सिंहगड एक्स्प्रेस ट्रॅकवर अडकून पडली आहे. सिंहगड एक्स्प्रेसच्या मागोमाग लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेस गाड्यांची रांग लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सिंहगड एक्स्प्रेसला भायखाळा स्थानकातून नवे इंजिन आणून ट्रॅकवरून बाजूला केले जाईल. मात्र, या सगळ्यात आणखी काही वेळ जाणार असल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता आहे.
भिवपुरी येथे सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी सकाळी ५.०५ मिनिटांची मुंबईकडे येणारी ट्रेन बदलापूर स्थानकात तब्बल अर्धा तास उशिरा पोहचली. त्यामुळे बदलापूर स्थानकात गाडीसाठी ताटकळत असलेले प्रवाशी संतप्त झाले. त्यानंतर या प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवर उतरून अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक रोखून धरली होती. यावेळी प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयालाही घेराव घालत संतप्त भावना व्यक्त केल्या. यापुढे गाडी वेळेवर येईल असे लिहून द्या, अशी मागणी करत प्रवाशी अडून बसले होते. या सगळ्या गोंधळामुळे गेल्या सहा तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. तब्बल सहा तासांनंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर प्रवाशांनी हे आंदोलन मागे घेतले होते.