scorecardresearch

हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची शताब्दी; भारतीय हवाई क्षेत्रात १६ टक्के महिला नियंत्रक

भारतीय हवाई क्षेत्राचे व्यवस्थापन ३,१६२ हवाई वाहतूक नियंत्रक करतात. यात १६ टक्के महिला आहेत.

Plane
(प्रातिनिधीक फोटो)

भारतीय हवाई क्षेत्रात १६ टक्के महिला नियंत्रक

मुंबई: मुंबई विमानतळावर एक हजारपेक्षा जास्त विमानांची हाताळणी करणाऱ्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी)शंभर वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधून विमान हाताळणीचा अनुभव आणि आव्हाने यांची माहिती दिली. सध्या भारतीय हवाई क्षेत्रात १६ टक्के महिला हवाई वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात व्यग्र असे विमानतळ आहे. यावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नवीन टॉवरची उभारणी १९९९ मध्ये आणि त्यानंतर २०१३ मध्ये देशातील सर्वात उंच अशा एटीसी टॉवरचीही उभारणी केली. या विमानतळावरून ६ जून २०१८ मध्ये १००३ सर्वाधिक विमानांची हाताळणी करण्यात आली. यात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची भूमिका महत्त्वाची होती.

एकंदरीतच भारतीय हवाई क्षेत्र आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष याविषयी वाहतूक नियंत्रक गिल्डचे क्षेत्रीय सचिव सैफुल्ला यांनी मुंबई, चैन्नई, दिल्ली, कोलकोत्ता अशी विभागणी भारतातील हवाई क्षेत्राची झाल्याचे सांगितले. ६० टक्क्यांपेक्षा जास्त हवाई क्षेत्रामध्ये बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदूी महासागरावरील सागरी हवाई क्षेत्राचा समावेश असून ते सर्वात गुंतागुतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रातून जाणाऱ्या विमानांशी संपर्क आणि त्यांचे मार्ग इत्यादी माहिती ठेवणे हे आव्हानात्मक काम असते. हवाई वाहतूक नियंत्रक यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

 सध्या भारतीय हवाई क्षेत्राचे व्यवस्थापन ३,१६२ हवाई वाहतूक नियंत्रक करतात. यात १६ टक्के महिला आहेत. विमानांची हाताळणी या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या हाती असते. वाहतूक क्षेत्राची व्याप्ती वाढत असल्याने २०३० पर्यंत जगाला आणखी ४० हजार आणि आशिया पॅसिफिक क्षेत्राला एक हजार वाहतूक नियंत्रकांची गरज लागेल, अशी माहिती हवाई वाहतूक नियंत्रक गिल्डकडून देण्यात आली. सध्या मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात ३५० कर्मचारी आहेत.

१९२२ मध्ये नियंत्रण कक्ष सुरू

मुंबईत प्रत्यक्षात हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष १९२२ मध्ये सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धातही हवाई दलातील विमानांसाठी या विमानतळाचा वापर होत होता. मुंबई विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने बरेच बदल अनुभवले. २२ फेब्रुवारी १९२२ ला जॉर्ज जिमी जेफ यांना हवाई वाहतूक नियंत्रकाचा पहिला परवाना देण्यात आला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Century of air traffic control room 16 percent women controllers in indian airspace akp

ताज्या बातम्या