ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन

राज्यातील नर्सिग होम, खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी ‘सिझेरियन’ची आकडेवारी जाहीर करावी, अशा ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून मुंबईतील एका संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे.

‘बर्थ इंडिया’ या संस्थेने मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयात होणाऱ्या सिझेरियन प्रसूती २०१० ते २०१५ या काळात दुप्पट झाल्याचे निदर्शनास आणले होते. या माहितीच्या अधिकारातील आकडेवारीनुसार २०१० साली सिझेरियनचे प्रमाण १६.७ टक्के होते. हे प्रमाण २०१५ साली ३२.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. सरकारी रुग्णालयाच्या तुलनेत खासगी रुग्णालयातील सिझेरियनची संख्या २०० टक्क्य़ांहून अधिक आहे, असे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. याबाबत ‘बर्थ इंडिया’ संस्थेच्या सुबर्णा घोष यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली होती. देशातील कानाकोपऱ्यातून दीड लाखांहून अधिक जणांनी या याचिकेला पाठिंबा दर्शविला. याची दखल घेत केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाने सीजीएचएस प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या रुग्णालयांच्या अटींमध्ये त्यांना सिझेरियन प्रसूतीची माहिती जाहीर करणे बंधनकारक असल्याची अट समाविष्ट केली आहे. सरकारी रुग्णालयांतील  सिझेरियनच्या आकडेवारीमुळे या भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निदर्शनास येतील आणि त्यानुसार उपाययोजना करणे सोपे जाईल, असे घोष यांनी सांगितले.

केंद्राच्या पाठिंब्यानंतर आता राज्य सरकारने सिझेरियनच्या नावाखाली सुरू असलेला बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी सुबर्णा घोष यांनी केली आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. सध्या खासगी रुग्णालयांत आवश्यकता नसतानाही सिझेरियन प्रसूती केली जाते. ही बाब त्या रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेला माहिती असावी यासाठी रुग्णालयांनी ही आकडेवारी जाहीर करावी. यामुळे गर्भवती महिला योग्य रुग्णालयाची निवड करू शकते, असेही घोष यांनी नमूद केले.

अनेकदा खासगी रुग्णालयात गरज नसतानाही सिझेरियन प्रसूती केली जाते. आरोग्याच्या समस्या, गर्भपात अशा कारणांनी सिझेरियन केले जाते. सध्या रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूतीकडे कल वाढला आहे. मात्र सिझेरियन प्रसूतीमध्ये रक्तस्राव होऊन अशक्तपणा येतो, असे जेजे रुग्णालयाच्या स्त्री-रोगतज्ज्ञ विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. रेखा डावर यांनी सांगितले.

त्रास टाळण्यासाठी..

खासगी रुग्णालयात १० ते १५ हजारांपर्यंत नैसर्गिक प्रसूती केली जाते; मात्र सिझेरियनसाठी या रुग्णालयातून ३० ते ४० हजार रुपये आकारले जातात. अनेकदा महिला प्रसूतीदरम्यान होणारा त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांवर विश्वास ठेवून दुप्पट पैसे खर्च करतात.