गुरुपौर्णिमेचे महत्त्व सर्वच जण जाणतात. आपल्या गुरुचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याचा हा मंगल दिवस. याच दिवसाचे औचित्य साधून शास्त्रीय संगीत क्षेत्रात नवी पिढी घडवणाऱ्या संगीतगुरूंशी संवाद साधायची संधी ‘लोकसत्ता’च्या वाचकांना मिळणार आहे. जयपूर- अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर-काटकर ‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून रसिकांशी मुक्त संवाद साधणार आहेत.
‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून महिन्यातून एकदा विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांशी संवाद साधता येतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या महिन्यात गानगुरू श्रुती सडोलीकर- काटकर रसिकांच्या भेटीला येणार आहेत. उस्ताद अल्लादिया खाँच्या परंपरेतील गायकी समर्थपणे पुढे नेणाऱ्यां गायिकांपैकी श्रुतीताई एक आहेत. जयपूर अत्रौली घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे नेताना या घराण्याची पेचदार लयकारी नजाकतीने पेश करण्यात श्रुतीताईंचा हातखंडा आहे. त्यांचे ख्याल या गानप्रकारावर प्रभुत्व आहे. तसेच ठुमरी, टप्पा, नाटय़संगीत आदी उपशास्त्रीय प्रकारांतही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. देश व परदेशातही श्रुतीताईंच्या अनेक ठिकाणी मैफिली झाल्या आहेत. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, स्वित्र्झलड या देशांतील त्यांच्या कार्यक्रमांना विशेष लोकप्रियता मिळाली होती.
श्रुतीताईंना २०११मध्ये  संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. म्हणूनच यंदाच्या गुरुपौर्णिमेला या संगीत गुरूंशी बातचीत करण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’तर्फे दिली जाणार आहे. कोल्हापूरच्या संगीतप्रेमी सुरेल घरात जन्म झाल्याने श्रुतीताईंना संगीताचे धडे घरापासूनच मिळाले होते. त्यांचा गायन क्षेत्रातला प्रवास, त्यांची कारकीर्द, कुलगुरू म्हणून काम करतानाचे अनुभव अशा अनेक विषयांवर त्या रसिकांशी संवाद साधतील. ‘व्हिवा’च्या अतिथी संपादक आणि  प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी श्रुतीताईंशी संवाद साधतील.
कोठे आणि केव्हा?
*आज : दि. २२ जुलै
*वेळ : दुपारी साडेतीन वाजता
*स्थळ :  पु.ल. देशपांडे मिनी
     थिएटर, प्रभादेवी.