जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांचा सर्वात पहिला फोन आला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. यासोबतच लवकरच आपण राजकारणात सक्रीय होऊ असंही त्यांनी म्हटलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सांताक्रूज येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

यावेळी त्यांना पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी शिवसेनेचा आणि आमचा २५ वर्षांपासून चांगला घरोबा आहे. २५ वर्ष आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आहे, ऋणानुबंध राहिले आहेत असं सांगितलं. पडत्या काळात शिवसेनेने दोन चांगले शब्द बोलले असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात पुन्हा सक्रीय होण्यासंबंधी विचारलं असताना तब्बेत सुधारल्यानंतर लोकांमध्ये जाईन असं त्यांनी सांगितलं.

ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपात मला तुरुंगवास झाला, आज त्याच महाराष्ट्र सदनाचा सर्वजण लाभ घेत आहेत, देशात या सदनाचा लौकीक आहे असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढील काही दिवस आपण कुटुंबियांसोबत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. छगन भुजबळ यांच्यावर केईएम रुग्णालयात स्वादुपिंडावरील आजारावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. तसेच भुजबळ कुटुंबियांनी लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा अशी विनंतीही रूग्णालय प्रशासनाला केली होती. त्यामुळे भुजबळ यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला.

छगन भुजबळ यांनी निवासस्थानी पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘आजार पूर्णपणे बरा झालेला नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे सक्रीय राहणार नाही या अटीवर मला डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. चेकअप करत त्यांच्या देखरेखेखाली राहायचं आहे. एक दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार असून त्यासाठी पुन्हा एकदा रुग्णालयात भर्ती व्हावं लागेल. जे काही असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करु’. यावेळी भुजबळांना इतर कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्यास नकार दिला.

छगन भुजबळ यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने साधारण महिनाभरापूर्वी जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी उदरविकारासंबंधीचे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू होते.

दरम्यान, येत्या १० जूनला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या समारोपाला छगन भुजबळ हे पुन्हा राजकारणात सक्रीय होतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दलित आणि इतर मागासवर्गीयांची एकजूट दाखवून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.