‘एक संजूबाबा व्हाईट बिर्यानी के साथ’ अशी ऑर्डर तुम्हाला ऐकायला मिळेल मुंबईतील भेंडी बाजारमधील ‘नूर मोहम्मदी हॉटेल आणि कॅटरर्स’मध्ये. भेंडी बाजारमधील या हॉटेलमध्ये चक्क बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या नावाने चिकनची चव लोकांना चाखता येते. मसालेदार, तूपामध्ये लगडलेलं आणि प्रत्येक घासाला स्वर्गसुखाचा आनंद तुम्हाला हा विशेष पदार्थ खाताना येत असतो, असं सामान्य खवय्यांचंच नव्हे तर बॉलीवूडमधील अनेक तारकांचंही म्हणणं आहे. मात्र, आज खवय्यांना आपल्या आवडत्या ‘चिकन संजूबाबा’ला मुकावे लागणार आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झालेल्या संजय दत्तने आज न्यायालयासमोरच हजर होण्याचे ठरविले आहे आणि त्यानुसार तो टाडा न्यायालयासमोर येणार आहे. संजयचे हॉटेलशी आणि हॉटेल मालकांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध या पार्श्वभूमीवर आज हॉटेल व्यवस्थापनाने ‘चिकन संजूबाबा’ ग्राहकांना न देण्याचा निर्णय घेतला आहे.
ताजी तंदूरी रोटी आणि पांढ-या बिर्याणीसोबत खवय्ये तुम्हाला येथे चिकन संजूबाबावर ताव मारताना दिसतात. विशेष म्हणजे ह्या पदार्थाला इतके ग्लॅमर मिळाले असूनही ‘चिकन संजूबाबा’च्या हाफ प्लेटची किंमत अवघी रूपये ४५ आहे. १९८६ साली संजय दत्त ‘नूर मोहम्मदी हॉटेल आणि कॅटरर्स’च्या एका नव्या भागाचे उद्घाटन करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने चाखलेला चिकनचा पदार्थ आवडल्याची पावती हॉटेलचे मालक खालीदभआई यांना दिली आणि तेव्हापासून हा पदार्थ ‘चिकन संजूबाबा’ नावाने प्रसिध्द आहे.