शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सोमवारी विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्यावर घणाघाती प्रतिहल्ला चढविला. विरोधक कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना झालेल्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे आज राज्याची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्यात सिंचन नाही, शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. आता घोटाळेबाज काय शेतकऱ्यांबद्दल बोलणार, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. वर्धा बॅंक कोणी खाल्ली, बुलढाणा बॅंक कोणी खाल्ली, लातूर बॅंक कोणी खाल्ली, असे विचारत त्यांनी तुम्ही बॅंकाच खाल्ल्या असा आरोप करीत विरोधकांच्या टीकेतील हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सत्तेवर असताना उद्योगांसाठी ५० हजार कोटींची सूट दिली होती, याची आठवण करून देत फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षात सरकारने ८ हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. आता दहा हजार कोटी रुपये वाटण्यात येतील असे स्पष्ट केले.
फडणवीस यांच्या भाषणावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.