मुंबई : राज्यात हल्ली अंधभक्तांचा सुळसुळाट झाला असून सगळीकडे उदोउदो सुरू झाला आहे. जिकडे फायदा तिकडे तो झुकत असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजप आणि मनसेवर केली.  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहिलेल्या ‘आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी- कॉन्टेपररी रिलिवन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोळळय़ात मुख्यमंत्री बोलत होते. नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सहभागी होताना ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडताना, आम्ही बाबासाहेबांचे भक्त आहोत. भक्त म्हणजे अंधभक्त नाही. अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट आहे. अंधभक्त काही काही वेळेला दैवत बदलू शकतो. पण भक्त हा आपल्या दैवताच्या विचारांवर आयुष्यभराची वाटचाल करतो. भक्त आणि अंधभक्त यांच्यात हा फरक असल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला. आता स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या गोष्टीवर हे स्वातंत्र्य टिकून आहे. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले भारतीय संविधान.  बाबासाहेबांनी फक्त घटनाच लिहिली असे नाही, तर भविष्यात काय अडथळे येऊ शकतात हेही आपल्याला दाखविले असून त्याबद्दलचा मार्गही दाखविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.