मुंबई : मुंबईत मागील दोन महिन्यांपासून वाढलेला डेंग्यूचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी चिकुनगुनियाचे प्रमाण मात्र वाढतच आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये चिकुनगुनियाचे रुग्ण दुपटीहून अधिक वाढले असून वर्षभरात आतापर्यंत ३४ रुग्णांचे निदान झाले आहे.

डेंग्यू आणि चिकुनगुनिया या दोन्ही आजारांचा प्रसार ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला की चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्याही वाढते. या वर्षीही अशीच स्थिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागताच चिकुनगुनियाचे रुग्णही आढळून आले आहेत.

पालिकेच्या आकडेवारीमध्ये गेल्या वर्षांपर्यंत चिकुनगुनियाच्या रुग्णांची शून्य नोंद झालेली आहे, परंतु या वर्षी ऑक्टोबपर्यंत ३४ रुग्ण आढळलेले आहेत. सप्टेंबरमध्ये मुंबईत चिकुनगुनियाचे केवळ सात रुग्ण होते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून २१ ऑक्टोबपर्यंत १९ रुग्ण आढळले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चिकुनगुनिया वाढत असून प्रामुख्याने पूर्व उपनगरीय भागांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या दृष्टीने प्रतिबंधात्मक कार्यवाहीही पालिकेने सुरू केली असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. पावसाळी आजारांच्या रुग्णांची माहिती कळविण्याबाबत दरवर्षी खासगी डॉक्टरांना कळविले जाते; परंतु याला तुलनेने फार कमी प्रतिसाद मिळतो. याही वर्षी या आजारांचे रुग्ण कळविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असून डॉक्टरांना या रुग्णांची संख्या कळविण्याच्या सूचना करण्यात आली आहे, असे डॉ. गोमारे यांनी सांगितले.

हिवतापाच्या रुग्णांमध्येही निम्म्याने घट

शहरात हिवतापाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सप्टेंबरच्या तुलनेत निम्म्याने घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे ६०७ रुग्ण आढळले होते, तर २१ ऑक्टोबपर्यंत ३१२ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे.

स्वाइन फ्लूचे प्रमाण कमीच

स्वाइन फ्लूचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी वाढले असले तरी सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये मात्र कमी झाले आहे. सप्टेंबरमध्ये नऊ रुग्ण होते, तर ऑक्टोबरमध्ये सहा रुग्ण आढळले आहेत. वर्षभरात आतापर्यंत ६१ रुग्ण आढळले आहेत.

करोनामुक्त किंवा दीर्घकालीन आजार असलेल्यांना तीव्र लक्षणे

करोनामुक्त झालेल्या किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे चिकुनगुनियाची लक्षणे तीव्र प्रमाणात दिसून येत आहेत. अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. लेले यांनी व्यक्त केले.

लक्षणे असूनही चाचण्यांमध्ये निदानात अडचण

चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या नक्कीच वाढली आहे; परंतु काही रुग्णांमध्ये चिकुनगुनियाची लक्षणे असली तरी चाचण्यांमध्ये मात्र निदान होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांबाबत प्लेटलेट्स, रक्ताच्या इतर चाचण्या यांमधून निदान केले जाते आणि उपचार सुरू करतो. परंतु रुग्णांनीही ताप, असह्य सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यावर घरीच उपचार न करता डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असल्याचा सल्ला फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी दिला आहे.

डेंग्यूमध्ये काही प्रमाणात घट

मागील दोन महिन्यांपासून झपाटय़ाने वाढत असलेला डेंग्यूचा प्रादुर्भाव ऑक्टोबरमध्ये काही प्रमाणात कमी झाला आहे. सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे २५७ रुग्ण आढळले होते, तर २१ ऑक्टोबपर्यंत १५४ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे.