दातांच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या एका चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दहिसर येथे घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी शवविच्छेदन अहवालानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मालाडच्या चिंचपाडा येथे राहणाऱ्या जिवीयन ओडगामा(४) या मुलाचे दात किडले होते. त्याच्या दातांवर उपचार करण्यासाठी त्याला बोरिवलीच्या चिकूवाडी येथील दंतवैद्यक डॉ़ मालिनी सहानी यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आणले होते. त्याचे किडलेले सात दात काढून त्यावर ‘रूट कॅनल’ करण्यात येणार होते. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून त्याच्यावर ‘रूट कॅनल’ची शस्त्रक्रिया करण्यात येत होती. त्यासाठी त्याला भूल देण्यात आली. दुपारी दोनपर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर जिवीयन शुद्धीवर आलाच नाही.
त्यानंतर त्याला दहिसर अशोकवन येथील चिरंजिवी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पावणेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दंतवैद्यक डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळेच जिवीयनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
आम्ही शस्त्रक्रियेदरम्यान वापरलेली सर्व औषधे जप्त केली आहेत. जिवीयनच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांनी सांगितले. अहवालात काही संशयास्पद आढळल्यास तो ‘बोर्ड ऑफ मेडिकल’कडे पाठविला जाईल आणि त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. भुलची मात्रा जास्त प्रमाणात देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.