मागून येणारी गाडी पकडण्यासाठी कल्याणऐवजी डोंबिवली स्थानकात उतरण्याची चूक चित्रा आणि भाविकाच्या मनावर आघात करणारी ठरली. खोटे आरोप करून या दोघींना तुरुंगात डांबणाऱ्या रेल्वे पोलिसांनी त्यांच्याशी जे वर्तन केले, ते कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या जिवाचा थरकाप उडवणारे आहे.
डोंबिवलीत रेल्वे पोलिसांची गुंडगिरी
 डोंबिवली स्थानकातून चित्रा व भाविकाला अटक करणाऱ्या पोलिसांनी त्यांना तुरुंगात डांबल्यानंतर त्यांना पकडल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यांचे मोबाइलही काढून घेतले. त्यापूर्वी चित्राने कसाबसा आपल्या एका मित्राला ‘हेल्प मी. डोंबिवली रेल्वे पोलीस’ असा मेसेज पाठवला होता. तेव्हा या मित्राने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि हा प्रकार लक्षात आला. दुसऱ्या दिवशी दोघींना न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. पण त्याआधीची रात्र त्यांना हादरा देणारी ठरली. रात्री कोठडीत पुरुष पोलिसाने पट्टय़ाने अमानुष मारहाण केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या दोघींना उद्देशून अत्यंत संतापजनक उद्गारही काढले.
या दोघींचे दुर्दैव येथेच संपले नाही. आपल्यावरील अन्यायाविरोधात त्यांनी रेल्वेचे पोलीस आयुक्त प्रभातकुमार यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनीही त्यांना उलट पुन्हा उपायुक्तांकडे जाण्याचा शहाजोग ‘सल्ला’ दिला. वर पोलिसांनी ‘पाकीटमार तरुणींना अटक’ अशा आशयाचे वृत्त मुलींच्या नावासकट स्थानिक वृत्तपत्रांना पुरवले.