मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांची नावं बीएमसीने पाणीपट्टी भरली नसल्याने डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. यांचं पाणी तोडून टाका… बिना आंघोळीचं त्यांना विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. कारण या बंगल्याचं साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही माहिती समोर आली.

अजित पवार यांना यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटलं आहे की, ‘मुंबईत करोडो लोक राहतात. त्यांनी जरा कुठे पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्शन कापले जाते. ताबडतोब त्यांना पैसे भरावे लागतात. त्यांना वाली कुणी नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावरील मीटरचे पैसे भरले जात नाही. राज्यसरकारची दयनीय अवस्था झाली आहे का? पैसे वेळेवर भरले का जात नाही ? मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली का जाते?’.

महापालिका डिफॉल्टर यादीत टाकत असेल तर हा कमीपणा नाही का? अधिकारी झोपा काढतात का?  महाराष्ट्र काय धडा घेईल. जनता म्हणेल हेच पैसे भरत नाही तर आपण तरी कशाला भरावे ? याची नोंद घ्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.

मुखमंत्र्यांना आंघोळीला उशीर होता कामा नये, त्यांचं पाणी बिल मी स्वतः भरणार – जितेंद्र आव्हाड

सोमवारी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावत आपण स्वत: मुख्यमंत्र्यांचं पाणी बिल भरणार असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना आंघोळीला, तोंड धुण्यास उशीर होता कामा नये अन्यथा निर्णय प्रक्रियेत उशीर होईल असाही टोला लगावला होता.

‘मुख्यमंत्र्यांचं बिल कितीही असो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचं बिल मी स्वत: चेकने भरणार आहे. त्यांचं पाणी अजिबात कापता कामा नये. त्यांना आंघोळीला, तोंड धुण्यास उशीर होता कामा नये. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत उशीर होईल आणि हे महाराष्ट्राला परवडणारं नाही’, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.