अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. येत्या दोन वर्षांत मुंबईतील एकाही पुनर्विकास प्रकल्पाचे काम शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास रखडल्याच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. बीडीडी चाळींची जमीन ही सोन्याचा तुकडा आहे. या जमिनींवर अनेक बिल्डरांचा डोळा होता. मी विधानभवनात प्रवेश केल्यापासून प्रत्येक अधिवेशनात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची चर्चा व्हायची. मात्र यासंदर्भात ठोस निर्णय कधीच घेतला गेला नाही. इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे हे काम कधीच झाले नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. बीडीडी चाळींचा विकास करताना ६८ टक्के जमीन चाळकऱ्यांच्या घरांसाठी, तर ३२ टक्के जमीन विक्रीसाठी असे सूत्र वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वरळी, नायगाव, शिवडी, ना म जोशी मार्ग या ठिकाणी ९२.७० एकर जागेवर २०८ बीडीडी चाळी आहेत. प्रत्येक इमारतीत १६० चौरस फुटांच्या ८० निवासी सदनिका असून त्यांची संख्या १६ हजार २०३ इतकी आहे. या पुनर्विकास प्रकल्पातून १३ हजार ६०० अतिरिक्त सदनिका व्रिकीसाठी उपलब्ध होतील.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू केले होते. अडीच वर्षांनंतर हा पहिला प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे. वरळी येथील बीडीडी चाळ रहिवाशांनी म्हाडामार्फत पुनर्विकास करण्यास आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय काय होतो, ते पाहूनच पुढील प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी सांगितले.

धारावी पुनर्वसन प्रकल्पाला विकासकांचा प्रतिसाद न मिळाल्याने बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींसाठी एल अँड टी आणि शापुरजी पालनजी या दोन बडय़ा विकासकांनी निविदा सादर केल्याने शासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. याप्रकरणी नोडल एजन्सी म्हणून वावरणाऱ्या म्हाडाने या दोन्ही चाळींसाठी कमी किमतीची निविदा असलेल्या विकासकाची निवड केली आहे. नायगावसाठी एल अँड टीची तर ना.म. जोशी मार्गसाठी शापुरजी पालनजी यांची निविदा सरस ठरली. म्हाडाने याबाबतचा निर्णय शासनाकडे पाठविला असून शासनाकडून अधिकृतपणे घोषणा केली जाईल. ना.म. जोशी मार्ग चाळींचा परिसर १३.९ एकरवर पसरला आहे. एकूण ५ लाख १५ हजार ८७२ चौरस मीटर इतक्या बांधकाम क्षेत्रफळात २२ मजल्याच्या पुनर्विकासाच्या १४ इमारती उभारल्या जाणार आहेत. याशिवाय या ठिकाणी खुल्या विक्रीसाठी उच्च व मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ मजली दोन टॉवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. नायगाव चाळींचा परिसर १३.३९ एकरवर (बांधकाम क्षेत्रफळ- ६ लाख ६८ हजार २०२ चौरस मीटर) पसरले असून त्यात १९ ते २३ मजल्याच्या पुनर्विकासाच्या २० इमारती, तर खुल्या विक्रीसाठी उच्च व मध्यम उत्पन्न गटासाठी ६० मजली चार टॉवर्स तसेच २० मजली व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.