मुंबई : राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारा विचार गट म्हणून केंद्रातील निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’ (महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि ठाण्यातील बडे विकासक अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यामुळे आता हे बिल्डर राज्याच्या विकासाला कोणती दिशा देणार, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने टीका केली आहे. 

राज्यात सत्ताबदल होताच नियोजन आयोगाऐवजी केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यासाठी निती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत दोघांशी चर्चाही केली. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर गेल्या महिन्यात संस्था स्थापन करण्याचा शासकीय आदेश जारी झाला. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ठाण्यातील विकासक अजय आशर आणि  नियोजन आयोगाचे मावळते कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे.

Delhi Lieutenant Governor V K Saxena
राज्यपालांचा एक आदेश अन् महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! माजी अध्यक्षांवर केला गंभीर आरोप
Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Jijau Vikas Party Announces Candidates for Bhiwandi and Palghar Lok Sabha Seats
जिजाऊ विकास पार्टी भिवंडी व पालघर लोकसभा लढवणार

काँग्रेसची टीका

राज्य सरकारच्या विविध विभागांना सल्ला देण्याची जबाबदारी असलेल्या या संस्थेच्या उपाध्यक्षपदी आशर यांची नियुक्ती झाल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. नीती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेच्या उपाध्यक्षपदी आशर यांची नियुक्ती करुन मुख्यमंत्र्यांनी चुकीचा पायंडा पाडल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भाजपनेच पूर्वी आशर लुटारू असल्याचा गंभीर आरोप केला होता. अशा व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली. 

भाजपचा आक्षेप डावलला?

आशर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यास भाजपचा विरोध होता, असे सांगण्यात येते. पण मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती प्रतिष्ठेची केली होती. त्यातूनच स्थावर मालमत्ता क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांचा फार काही अनुभव नसतानाही आशर यांची वर्णी लावण्यात आली. हे आशर आता दहा क्षेत्रांमध्ये राज्याच्या विकासाकरिता कोणता सल्ला देतात याची उत्सुकता असेल.

राज्याच्या विकासाला दिशा देणे, विविध विभागांना सक्षम करणे, कृषी, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, नागरीकरण व बांधकाम क्षेत्र, पर्यटन, उर्जा आदी १० विभागांवर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी ‘मित्र’ या संस्थेवर सोपविण्यात आली आहे.

पक्षाचे खजिनदारही आशरच

‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या अजय आशर यांच्याकडे शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या खजीनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजन आयोगासोबतच शिंदे गटाच्या तिजोरीच्या चाव्याही आशर यांच्याकडेच राहणार आहेत, हे विशेष.

आशर यांची ओळख

* मुख्यमंत्र्यांच्या खास विश्वासातील, अशी अजय आशर यांची ओळख आहे. ठाण्यात त्यांचे अनेक प्रकल्प प्रगतिपथावर आहेत वा पूर्ण झाले आहेत.

* वागळे इस्टेटमधील कारखाने बंद पडल्यानंतर तेथे मोठाले टॉवर उभारण्याचे प्रकल्प आशर यांच्या कंपनीने हाती घेतले आहेत.

* बांधकाम क्षेत्राप्रमाणेच सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असल्याचा उल्लेख त्यांची नियुक्ती करणाऱ्या सरकारी आदेशात करण्यात आला आहे.

प्रवीण परदेशी अध्यक्षपदी ?

‘मित्र’ संस्थेचे अध्यक्षपद निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातील आदेश येत्या तीन-चार दिवसांत जारी केला जाईल. आशर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मुळ योजना होती. परंतु भाजपने आक्षेप घेतल्यानंतर आशर व क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती उपाध्यक्ष तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांचे प्रधान सचिवपदी काम केलेले परदेशी अध्यक्ष असा तोडगा काढण्यात आल्याचे मंत्रालयातील सूत्राने सांगितले.