scorecardresearch

BMC Election: भाजपाच्या Mission 150 मध्ये शिंदे गट आहे का? महापौर कोणाचा होणार? CM शिंदे स्पष्टच बोलले, “एकच गोष्ट…”

आक्रमक भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

BMC Election: भाजपाच्या Mission 150 मध्ये शिंदे गट आहे का? महापौर कोणाचा होणार? CM शिंदे स्पष्टच बोलले, “एकच गोष्ट…”
एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला प्रश्न

‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी आक्रमक भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शाह यांनी दिले. यावेळी भाजपाच्या मिशन १५० ची घोषणा करण्यात आली. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी या १५० मध्ये शिंदे गट आहे की नाही याबद्दल भाष्य केलं. तसेच महापौर कोणाचा असेल या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

नक्की वाचा >> राज ठाकरेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? मनसेसोबत युती झाल्यास पुढील प्लॅन काय? CM शिंदे म्हणाले, “राज ठाकरेंवर जेव्हा…”

शाह यांचा ह्लाबोल…
दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या शाह यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वानी सज्ज राहून, भाजपा-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. ‘‘राजकारणात सारे काही सोसले, तरी दगाबाजी सहन करू नका. जे दगा देतात, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणात भाजपाचे वर्चस्व दाखविण्याची आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे’’, असे शाह म्हणाले.

मिशन १५० ची घोषणा
मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे: आशिष शेलार गेल्या निवडणुकीत जे निसटले, ते यंदा गमवायचे नाही, असे सांगून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यावेळी म्हणाले, मागील निवडणुकीत १३ प्रभागांमध्ये ५० ते १०० मतांनी आपला पराभव झाला. आता १५० जागांवर विजय मिळवायचा आहे. मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली असून, आता मुंबईकरांसाठीच आपल्याला मैदानात उतरायचे आहे. गेल्या निवडणुकीत अधुरे राहिलेले स्वप्न २०२२ ला पूर्ण करायचे आहे, असंही शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

नक्की वाचा >> CM शिंदेंचा मोठा खुलासा! मोदी, शाहांकडे केलेली ठाकरेंबरोबर बंद दाराआड झालेल्या बैठकीसंदर्भात विचारणा; उत्तर मिळालं, “आम्ही जर…”

१५० मध्ये शिंदे गट आहे का?
याच बैठकीसंदर्भात टीव्ही ९ च्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. “आज अमित शाह मुंबईत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी मिशन १५० ची घोषणा केली. त्यामध्ये तुमची सेना आहे का? की फक्त भाजपाचं लक्ष्य १५० आहे?” असं शिंदेंना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना शिंदेंनी, “त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, शिवसेना-भाजपा युती मुंबईमध्ये एकत्र निवडणूक लढवणार,” असं स्पष्ट केलं.

महापौर कोणाचा?
यानंतर मुख्यमंत्र्यांना, “महापौर कोणाचा होणार? भाजपा की शिंदे सेनेचा होणार?” असं विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी, “अजून निवडणुका आहेत. निवडून यायचं आहे. त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळेच एकच गोष्ट आहे की शिवसेना-भाजपा एकत्र निवडणूक लढवणार आणि युतीचा महापौर होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे,” अशी आठवण करुन दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या