मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा, मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई :  करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी ही बंधने अजून उठवलेली नाहीत. करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. पण मुंबईतील आजची गर्दी चिंताजनक आहे. अशीच गर्दी राहिली तर  पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईकरांना दिला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए)डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाण पुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचे ई लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले.

राज्यात करोनाचे कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. याकाळात एमएमआरडीएने उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबई सारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले. मुंबई मेट्रोच काम आखीव-रेखीव आणि देखणे झाले आहे. मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करोना काळात विकास कामांचा पुढचा टप्पा वेगाने पार पाडावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्राधिकरणास दिल्या.

दुर्गाडी पुल आणि राजनोली उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे मुंबई महानगर परिसरातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले. प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त डॉ. गोविंदराज यांनी आभार मानले.

मुंबई मेट्रो-२ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो लाईनच्या चाचणीच्या निमंत्रणपत्रिकेवर मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री यांची तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची नावे होती. पण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात न आल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला व निषेध आंदोलनही केले.

केंद्राचा भेदभाव – अजित पवार</strong>

राज्यकर्ते येत असतात, जात असतात बदल होत असतात. शेवटी जनतेच्या मनात जे असते जनता त्यांना निवडून देत असते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधून आपण सर्वांनी हे पाहिले आहे. शेवटी वरच्या ठिकाणी देखील कुणीही राज्यकर्ते असले, मागील काळात मनमोहन सिंग, शरद पवार, पी. चिदंबरम हे काम करत होते, तेव्हा असा भेदभाव कधी होत नव्हता. मात्र आता तो थोडासा जाणवतो आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे नाही याबाबत सगळ्यांनी नीट विचार करावा, एवढीच माझी अपेक्षा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीमधील भेदभावाबाबत नाराजी व्यक्त केली.

तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान सर्वप्रथम मुंबईत येणार होते, त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. मात्र काही कारणाने पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला, याचे कारण आम्हाला कळू शकले नाही, असेही त्यांनी नमूद के ले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray warns mumbaikars over lockdown restrictions zws
First published on: 01-06-2021 at 00:21 IST