मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड केले असले तरी, महाविकास आघाडी सरकारची कायदेशीर बाजू भक्कम आहे, त्यामुळे सरकार पाडण्याचा भाजपचा डाव यशस्वी होणार नाही, असे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.  मुंबईत शनिवारी थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी सार्वजिनक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व इतर मंत्री तसेच आमदारांची बैठक झाली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती थोरात यांनी नंतर माध्यमांना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंत्री, प्रशासन कार्यरत आहे. सध्या राज्यात खरिपाचा हंगाम सुरू आहे, त्याबाबत आढावा घेण्यात आला. जनतेची कामे थांबवू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सरकारचे काम सुरू आहे. आघाडी सरकारला कसलाही धोका नाही, असा दावा थोरात यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे, याकडे लक्ष वेधले असता, आता ही कायदेशीर लढाई सुरु झाल्याचे ते म्हणाले. मात्र  सरकारची कायदेशीर बाजू भक्कम आहे. आघाडी सरकार स्थापन करण्याच्या वेळी दिल्लीतील ज्या विधितज्ज्ञांनी मार्गदर्शन केले, ते सर्व आताही कार्यरत झाले आहेत. त्यामुळे आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.