भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वबळावर सत्तास्थापनेच्या आवाहनाची खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शरीफ भेटीवर केलेली टिप्पणी आणि महाराष्ट्रातील भाजप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली असताना केलेली शेरेबाजी यांमुळे भाजप-शिवसेनेत गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेला जागा दाखवून देणारे इशारे देण्यास सुरुवात झाली असून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाजपच्या बाजूने पहिला वार केला आहे.
भाजपप्रणीत रालोआमध्ये सहभागी असतानाही, केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात चालून आलेले मंत्रिपद नाकारून शिवसेनेने भाजपला डिवचले, तेव्हापासूनच या शीतयुद्धाच्या ठिणग्या उडतच होत्या. याच पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी होऊन पदरी पडलेली मंत्रिपदे स्वीकारणे भाग पडल्याने सेनेत नाराजी होती. सेनेचे प्रवक्ते संजय राऊत तसेच सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वेळोवेळी खिल्ली उडवत ही नाराजी व्यक्त करत होते, तर भाजपमधून एकनाथ खडसे, आशीष शेलार आदी नेते त्यावर सडेतोड उत्तरेही देत होते. सत्तेत राहून सरकारवर टीका करण्यापेक्षा बाहेर पडा असा थेट सल्लाही खडसे यांनी अनेकदा सेनेला दिला होता. मात्र, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो असून, गरज पडेल तेथे सरकारला धारेवर धरणारच असे बजावत उद्धव ठाकरे यांचेही प्रतिहल्ले सुरूच होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची तसेच पक्षाध्यक्ष शहा यांच्या वक्तव्याचीही खिल्ली उडविल्याने सत्तेतील या भागीदार पक्षांमधील दरी अधिकच रुंदावली आहे. सीमेवरील परिस्थिती जैसे थे असताना चर्चा कसली करता, असा सवाल ठाकरे यांनी थेट मोदी यांनाच केला, तर स्वबळावर सत्ता संपादन करून राजस्थान, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे कारभार करणार का, असा खोचक सवाल करीत ललित मोदी प्रकरण, व्यापम घोटाळ्याकडे खोचक अंगुलीनिर्देश केला. महाराष्ट्रातील चिक्की घोटाळा, मंत्र्यांची पदवी प्रकरणे, आदी मुद्दय़ांवरही शिवसेनेने संधी साधत सुनावल्याने भाजपचे नेते चांगलेच दुखावले आहेत. आता सेनेला त्यांची जागा दाखवून द्यावी यावर भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर एकमत झाल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आज मैदानात उतरले. ‘केंद्रीय पातळीवरील धोरणात्मक बाबींवर अभ्यास न करता टिप्पणी करण्यापेक्षा, महापालिकेत सत्ता असलेल्या मुंबईच्या समस्या सोडवा’ असा सल्ला देऊन, शिवसेना हा मुंबईपुरता पक्ष असल्याचा इशाराच शनिवारी शेलार यांनी दिला.
अधिवेशनात काय दिसणार?
सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या मुद्दय़ावर सेना मंडळांच्या पाठीशी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असताना, भाजपने मात्र, न्यायालयाची भूमिका मान्य केल्याने, सेनेची पंचाईत झाली आहे. सेनेचा रात्रजीवनाचा प्रस्ताव रेंगाळत ठेवताना रात्रबाजाराची संकल्पना मात्र भाजपने आक्रमकपणे पुढे रेटली आहे. मंत्र्यांच्या अधिकारावरून सेना-भाजपमधील धुसफूस सुरूच आहे. या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सत्ताधारी बाकांवरील दुफळीचे चित्र कसे उमटते त्याकडे साऱ्या नजरा लागल्या आहेत.

मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्याचा खटला जलदगतीने चालावा, त्यातील आरोपींना शिक्षा व्हावी तसेच पाकिस्तानी तुरुंगातील भारतीय मच्छिमारांची मुक्तता व्हावी या दृष्टीने मोदी-शरीफ चर्चा महत्वाची असताना, आमच्या मित्रपक्षाने अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावयास हवी होती.
-आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष