नव्या भरतीत १२ उच्चशिक्षितांना नोकरीचा लाभ, अर्धशिक्षितांची पीछेहाट

मधु कांबळे, मुंबई</strong>

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
UPSC Releases Exam Schedule for 2025, Registration Dates and Exam Details Announced, upsc exams 2025, upsc exms 2025 exam schedule, Union Public Service Commission, Competitive Examination, marathi news, students, maharashtra students
पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक UPSC कडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

परिस्थितीमुळे किंवा बौद्धिक  वा आर्थिकअक्षमतेमुळे ज्यांना शैक्षणिक पदव्यांचा भरभक्कम आधार नाही, अशा तरुणांना उपाहारगृहातील नोकरी हे उपजीविकेचे साधन असते. मंत्रालयाच्या उपाहारगृहात त्यामुळेच १३ जागांची भरती जाहीर झाली तेव्हा अनेक बेरोजगार तरुणांच्या आशा उंचावल्या होत्या. किमान चौथी उत्तीर्ण, ही अर्हता असलेल्या या पदांसाठी झालेली भरती मात्र स्पर्धा परीक्षेसारख्या शंभर गुणांच्या लेखी परीक्षेने झाल्याने अर्धशिक्षितांची पीछेहाट होऊन १२ उच्चशिक्षित तरुण-तरुणींची भरती झाली आहे.

उच्च शिक्षण घेऊन चांगल्या सरकारी नोकरीची अपेक्षा करणाऱ्या आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या पदवीधर तरुणांना मंत्रालयातील उपाहारगृहात वाढप्याची नोकरी करावी लागणार आहे, हे वास्तव जितके अस्वस्थ करणारे आहे तितकेच अनेक अर्धशिक्षितांनी त्यांच्या आवाक्यातील हक्काचे काम केवळ शंभर गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या ओझ्यापायी गमावल्याचे वास्तवही अस्वस्थ करणारेच आहे. मंत्रालय उपाहारगृहातील वाढप्याच्या १३ पदांसाठी तब्बल सात हजार अर्ज आले आणि त्या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली गेली. आता ग्राहकांना त्यांनी मागविलेले खाद्यपदार्थ नेऊन देण्याच्या कामाची प्रात्यक्षिक परीक्षा एक वेळ होऊ शकते, पण शंभर गुणांची लेखी परीक्षा कशाला, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या पदांसाठी चौथी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली होती. मात्र बहुतांश अर्ज उच्चशिक्षितांचेच आले. यावर कडी म्हणजे या पदासाठी माहिती-तंत्रज्ञान आणि त्या विभागाने कंत्राट दिलेल्या एका खासगी कंपनीच्या माध्यमातून ही लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यात आठ तरुण आणि पाच तरुणी उत्तीर्ण  झाल्या. या परीक्षेत शंभरपैकी तब्बल ९६ गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि निवड झालेल्या उमेदवारांची संख्या सहा आहे. वाढपी पदासाठी निवड झालेले हे सर्व जण २५ ते २८ या वयोगटातील आहेत.

‘‘यात १२ जण पदवीधर आहेत, तर एकजण बारावी उत्तीर्ण आहे’’ अशी माहिती मंत्रालय उपाहारगृहांचे महाव्यवस्थापक दादासाहेब खताळ यांनी दिली.

सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी सध्या हमरीतुमरी सुरू आहे. राज्य सरकारने कायदा करून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील गरिबांना दहा टक्के सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी घटनादुरुस्ती केली आणि कायदा केला, त्याची काही राज्यांमध्ये अंमलबजावणही सुरू झाली. आरक्षणाची ही तरतूद होऊनही नोकऱ्यांची संख्या आणि बेरोजगारीचे प्रमाण यात मोठी तफावत आहे आणि त्यात किमान चौथी उत्तीर्ण ही अर्हता असलेल्या पदांवर उच्चशिक्षितांचीच नेमणूक झाल्याने अर्धशिक्षितांच्या रोजगाराचा प्रश्नही किती बिकट आहे, हेच उघड होत आहे.

उमेदवारांची गुणवत्ता यादी..

* पहिल्या क्रमांकाने निवड झालेल्या उमेदवाराला-१०० पैकी ९६ गुण मिळाले आहेत. ९४ गुण मिळालेल्या तीन उमेदवारांची निवड झाली आहे. त्या खालोखाल ९२ गुण मिळविणारे दोन उमेदवार आहेत. ९० गुणांचा एक आणि ८८ गुण मिळविणाऱ्या दोन उमेदवारांची निवड झाली आहे. ८२ आणि ८० गुण मिळविणारे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी ५० गुण मिळालेल्या उमेदवाराची निवड झाली आहे.

* गुणवत्ता यादीत ३४३२ उमेदवार असून त्यात ९० ते ९६ गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या ९५ आहे. ८० ते ८८ गुण मिळविणारे ४२७ उमेदवार आहेत. तर ७० ते ७८ गुणांचे ६०९ उमेदवार आहेत. सर्वात कमी म्हणजे चार गुण मिळालेल्या उमेदवाराचाही यादीत समावेश आहे.