कॉ. पानसरे यांच्या पार्थिवाला त्यांची सून आणि नातवाच्या हस्ते मुखाग्नि देण्यात आला. कोणताही धार्मिक विधी न करता पानसरे यांच्यावर  पंचगंगेच्या काठी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दसरा चौकात ठेवण्यात आले होते. येथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येथे भावूक वातावरण होते. त्याचबरोबर ‘शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे’च्या घोषणा दिल्या गेल्या. कार्यकर्ते आणि पानसरे यांच्या विचारांवार श्रद्धा असलेले लोक मोठ्या संख्येने हजर होते. यात कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, कॉम्युनिस्ट कार्यकर्ते, घरकामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली पाच दिवस मृत्यूशी कडवा संघर्ष करीत असलेल्या या झुंझार नेत्याचे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्राने कुशल संघटक, अनुभवसिद्ध लेखक, पुरोगामी विचारवंत आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणारा आणखी एक कार्यकर्ता गमावला. मारेकऱ्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
गेल्या सोमवारी सकाळी कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर मारेकऱ्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या. कोल्हापूर येथे झालेल्या या घटनेने महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोल्हापूरच्या अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर, परंतु स्थिर असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले होते. शुक्रवारी दुपारी पुढील उपचारांसाठी त्यांना खास हवाई रुग्णवाहिकेने मुंबईत आणून ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती. गोळी लागल्यामुळे त्यांची फुफ्फुसे निकामी झाली होती. रात्री उशिरा त्यातून रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. पानसरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच विविध राजकीय नेत्यांनी आणि पानसरे यांच्या चाहत्यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात धाव घेऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

*एखादी गोष्ट अन्यायकारक आहे हे आपल्या लक्षात आले तरी आपल्याला नुसता राग येऊन चालत नाही, तर त्या रागाला तर्कशुद्ध विचारांची जोड द्यावी लागते, कारण हितसंबंधांचा मुकाबला संघर्षांनेच करावा लागतो..

*एके काळी ज्ञानबंदी होती, स्पर्शबंदी होती, रोटीबंदी होती. या बंदी आज उरलेल्या नाहीत.  हे बदल झालेले आपण पाहतो आहोत. जातींची दाहकता कमी झाली आहे. त्यामुळे प्रयत्न केला तर परिस्थिती नक्कीच बदलेल..

*कोणतीही रचना टिकवण्याचे समर्थन केल्याशिवाय, त्यासाठीचे तसे तत्त्वज्ञान निर्माण केल्याशिवाय ती गोष्ट टिकवता येत नाही. आता जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठीचे तत्त्वज्ञान निर्माण करावे लागेल.
(पुण्यात झालेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ चर्चासत्रात पानसरे यांनी मांडलेले विचार)