ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे चर्च व्यवस्थापन चिंतेत

मुंबई : ओमायक्रॉन उत्परिवर्तनाने करोना संसर्गाचा धोका वाढवल्यामुळे यंदाच्या नाताळोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. ख्रिस्तजन्मदिनी अर्थात २४ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थनेबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबईतील काही चर्चनी मध्यरात्री प्रार्थनेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही चर्च अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. 

गेल्यावर्षी करोनाकहराने नाताळनिमित्त ऑनलाईन प्रार्थना करून घरोघरी साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करता येईल, सणाचा आनंद लुटता येईल अशी आशा ख्रिस्ती बांधवांना होती. पण ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक होऊ लागल्याने नाताळच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मुंबईतील चर्चना भेट देऊन मध्यरात्रीची प्रार्थना ऑनलाईन किंवा केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीत करावी अशी सूचना केली आहे.  काही चर्चमध्ये या नियमाचे पालन केले जाणार आहे. पण काही ठिकाणी मात्र या नियमासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे.

‘गेल्यावर्षी आम्ही करोनाचे सर्व निर्बंध पाळले. शासनाला सहकार्य केले. परंतु यंदा सणावर निर्बंध घालू नये. चर्चची सजावट, सुरक्षिततेची काळजी अशी पूर्वतयारी झालेली आहे. किमान प्रार्थनेला तरी निर्बंध घालू नये,’ असे भायखळा येथील सेंट अ‍ॅण्डय़्रूसन चर्चचे सिरील दारा यांनी सांगितले  गिरगावातील २०० वर्षे जुन्या अम्ब्रोली चर्चमध्येही नाताळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वयस्कर मंडळी आणि लहान मुलांना या चर्चमध्ये येण्यास मज्जाव केला आहे . तसेच ऑनलाइन प्रार्थनेचीही व्यवस्था केली आहे. परंतु मध्यरात्रीची प्रार्थना इथे होणार असल्याची महिती चर्चचे डॉ. तिवडे यांनी दिली. मुंबईतील बहुतांशी चर्चमध्ये असाच संभ्रम आहे. माहीम येथील चर्चमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असल्याने तेथे मध्यरात्रीच्या प्रार्थनेसाठी नागरिकांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलग दुसऱ्या वर्षीही करोना संकटामुळे उत्सवावर मर्यादा आल्याने ख्रिश्चन बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

घराघरांत उत्साह

  • गतवर्षी नाताळ  साधेपणाने साजरा करावा लागला होता. गेल्या काही महिन्यांपासून करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्यामुळे यंदा नियमांचे पालन करून नाताळ साजरा करता येईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे खरेदीला उधाण आले आहे.
  • सजावटीचे साहित्य, ख्रिसमस ट्री, चांदणी आकारातील कांदिल, दीपमाळा, निरनिराळय़ा आकारांच्या मेणबत्त्या, येशू ख्रिस्ताची मूर्ती खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. याशिवाय केक आणि मिठाईची मागणीही वाढली आहे.
  • चर्चच्या आसपासच्या परिसरात या वस्तूंची विशेष खरेदी होत आहे.  नागरिकांनी गृहसजावटीसह सुबक आणि सुंदर गव्हाणी (खिस्तजन्माचे दृश्य)  तयार केल्या आहेत. फक्त शासनाने ऐनवेळी निर्बंध अधिक कठोर करू नये, अशी मागणी ख्रिस्ती बांधवांकडून करण्यात येत आहे.