लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात राहुल गटाविरोधात खदखद व्यक्त होत असतानाच राज्यातील पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. काँगेसच्या देशव्यापी पराभवाच्या पाश्र्वभूमीवर आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा पर्याय राष्ट्रवादी चाचपत असल्याने काँग्रेसचे नेतेही सावध झाले आहेत.
तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल व तेलंगणा या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना मोदी लाटेचा फटका बसला नाही. पण यूपीएचे घटकपक्ष मात्र पराभूत झाले, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचे सारे खापर काँग्रेसवरच फोडले. प्रफुल्ल पटेल यांनीही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत पराभवाला काँग्रेसलाच जबाबदार धरले.
पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडत असतानाच गेले दोन दिवस काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणारे नारायण राणे यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला. काँग्रेस उमदेवारांच्या पराभवास राष्ट्रवादीच जबाबदार असून, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नाही, असा हल्ला राणे यांनी चढविला. राज्याचे नेतृत्व राणे यांच्याकडे सोपवावे, हा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा ठराव आणि प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीवर राणे समर्थकांनी घातलेला बहिष्कार या पाश्र्वभूमीवर राणे पक्ष नेतृत्वाच्या मनातून उतरणार असे चित्र निर्माण झाले असतानाच थेट शरद पवार यांना लक्ष्य करून राणे यांनी आपल्या विरोधात दिल्ली खट्टू होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार ?
निवडणुकीतील पराभवाचे खापर राष्ट्रवादीने काँग्रेसवर फोडलेच पण प्रचाराच्या काळात मोदी यांना अनुकूल अशी भूमिकाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भावी वाटचालीकडे काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत दोघांनाही एकमेकांची खरे तर गरज आहे. पण काँग्रेसबरोबर राहिल्याने नुकसान झाले, असा अर्थ पवार यांनी काढल्याने विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसविरोधीच कल राहणार असल्यास आघाडी टिकवावी का, असा प्रश्न राष्ट्रवादीत उपस्थित झाला आहे. अर्थात, सध्या पवार निकालाचे विश्लेषण करीत आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.