राज्याची सत्ता राबविताना ग्रामीण भागाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात चंचुप्रवेश करण्याचा सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न पहिल्या फटक्यात तरी यशस्वी झालेला नाही. २० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाने सहकार क्षेत्रावर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
जिल्हा पातळीवरील राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी नेतेमंडळींना जिल्हा बँक, दूध संघ, साखर कारखाने इत्यादि सहकारी संस्था ताब्यात ठेवाव्या लागतात. यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी जिल्हा बँकांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सहकारातील बहुतांश प्रस्थापित नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व कायम राखले आहे. राज्याच्या राजकारणात एकमेकांविरुद्ध असलेल्या पक्षांच्याही या निवडणुकीच्या निमित्ताने आघाडय़ा झाल्या होत्या.  
राज्याची सत्ता राबविताना भाजपने सहकार क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. महसूलमंत्री एकनाथ खडसे (जळगाव), ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे (बीड) यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. मुंबई जिल्हा बँकेत नुकतेच भाजपवासी झालेल्या प्रवीण दरेकर यांनी अन्य पक्षांच्या नेत्यांची मोट बांधून तयार केलेल्या पॅनेलला बहुमत मिळाले. या तीन बँका वगळता अन्यत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच सरशी झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मात्र या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. नांदेड जिल्हा बँकेत २१ पैकी १६ जागांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पॅनेलला विजय मिळाला. चव्हाण यांच्या अधिपत्याखाली असतानाच ही जिल्हा बँक अडचणीत आली होती. तिला अडचणीतून बाहेर काढण्याकरिता मुख्यमंत्रीपदी असताना अशोकरावांनी खास बाब म्हणून १०० कोटी मंजूर केले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला असताना नांदेडने काँग्रेसला साथ दिली होती. पण जिल्हा बँकेत काँग्रेस वा चव्हाण यांना मतदारांनी नाकारले आहे.
नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला. भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने रिंगणात उतरलेल्या विखे-पाटील गटाचे १० जण निवडून आले. थोरात यांचे ११ समर्थक निवडून आले असले तरी अध्यक्षपदासाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत मुलाचा तर विधानसभेत लागोपाठ दोनदा पराभव स्वीकारावा लागल्याने राजकीयदृष्टय़ा मागे पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग बँक निवडणुकीतील यशाने दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचा पराभव करून राणे यांनी हिशेब चुकते केले. रत्नागिरीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाले. तेथेही शिवसेनेचा पराभव झाला.
बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशा लढतीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभा, साखर कारखान्यापाठोपाठ जिल्हा बँकेत चुलतबंधू व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मात केली आहे. विरोधी पक्षनेतेपद देऊनही धनंजय मुंडे जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करू शकले नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीत आहे.
मतब्बर नेत्यांचे वर्चस्व कायम
अजित पवार (पुणे), जयंत पाटील (सांगली), दिलीप देशमुख (लातूर) या नेत्यांनी आपापल्या जिल्हा बँकांची सत्ता कायम राखली. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजप आणि राष्ट्रवादी-भाजप अशीही युती पाहायला मिळाली. औरंगाबादमध्ये काँग्रेस, भाजपने एकत्र येऊन स्थापलेल्या पॅनलला यश मिळाले. ठाण्यात राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या पॅनेलने सत्ता हस्तगत केली.
गड राखले
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या बँकांमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याशी आघाडी करून सत्तेत राष्ट्रवादीची भागीदारी कायम राहणार आहे. काँग्रेसला सिंधुदुर्ग, लातूर, नगर, परभणी, धुळे, गडचिरोली या बँकांमध्ये यश मिळाले. अकोल्यात राष्ट्रवादी तर गडचिरोलीमध्ये काँग्रेसने आपले गड कायम राखले आहेत.