कर्नाटकातील विजयाचे निमित्त

कर्नाटक विधानसभेच्या निकालाचा महाराष्ट्रातील राजकारणावर काही परिणाम होईल का, या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही देता येईल. कारण थेट परिणाम होणार नसला तरी काँग्रेसच्या दणदणीत विजयाने मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सावध व्हावे लागणार आहे. भाजपच्या पराभवामुळे युतीतील मित्र पक्ष शिवसेनेला भाजपच्या विरोधात बळ मिळाले आहे. एकूणच कर्नाटकच्या निकालाने काँग्रेसमध्ये आनंदाचे भरते आहे, तर भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणावर नाराज असलेल्या शिवसेनेला भाजपच्या पराभवाने समाधान झाले आहे. कर्नाटकातील मराठीविरोधी सरकार गेले ते बरेच झाले, अशा शब्दांत समाधान व्यक्त करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

राज्यालगतच्या कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसला नैतिक बळ मिळाले आहे. विविध घोटाळे, सर्वच आघाडय़ांवर आलेले अपयश या पाश्र्वभूमीवर कर्नाटकमधील विजय काँग्रेससाठी फायदेशीर असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या विजयाने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दुसरा आनंद असा की मित्रपक्ष राष्ट्रवादीला लगाम बसेल. काँग्रेसची पिछेहाट होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने काहीशी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निम्म्या जागा मिळाव्यात, अशी मागणी सुरू झाली होती. काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधी राष्ट्रवादीचे नेते सोडत नाहीत. अगदी स्थानिक संस्था करावरूनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसला कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशाने राष्ट्रवादीला सावध व्हावे लागेल. कारण घोटाळे किंवा विविध गैरव्यवहारांनंतरही जनमत काँग्रेसच्या मागे जाऊ शकते हे कर्नाटकच्या निकालाने सिद्ध झाले आहे. काँग्रेसच्या विरोधातील नाराजीचा फायदा उठविण्याचा भाजपचा राज्यात प्रयत्न आहे. नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तशी पाऊले उचलण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसच्या विरोधात मोठय़ा प्रमाणावर जनमत असतानाही काँग्रेसला कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशामुळे भाजपला महाराष्ट्रात तशी व्यूहरचना करावी लागेल. युती असली तरी भाजप आणि शिवसेनेत बेबनाव आहे. युतीत मनसेला बरोबर घ्यावे का, यावरून भाजप आणि शिवसेनेत दोन टोकाची मते आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने मागे टाकल्याचे शल्य शिवसेनेच्या मनात अजूनही आहे. कर्नाटकच्या निकालाने शिवसेनेला मनोमन आदंन झाला आहे हे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले.

 

उद्धव यांची गुगली

कर्नाटकातील मराठी विरोधी सरकारच्या पराभवाबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. हे मत व्यक्त करतानाच राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करीत गुगली टाकली. कर्नाटकतील पराभवाबद्दल समाधान व्यक्त करीत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जखमेवर मीठच चोळले आहे. युतीत भाजपला फारशी किंमत देत नाही हेच उद्धव यांनी दाखवून दिले.