मुलुंड येथील एका ब्युटी सलून आणि स्पामधून पैसे उकळणाऱ्या चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे. हे चारही पोलीस पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त खालीद कैसर यांच्याकडे कामाला होते. मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी हणुमंत कावळे आणि शेखर शिंदे हे पोलीस मुलुंड येथील रुद्राक्ष स्पा आणि ब्युटी सलूनमध्ये गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
त्यावेळी या दोघांनी ब्युटी पार्लरमधील कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. २२ डिसेंबर रोजीही दोन पोलीस ब्युटी पार्लरमध्ये येऊन धमकी देऊन १० हजार रुपये घेऊन गेले होते. त्यामुळे हे बनावट पोलीस असावेत असा संशय ब्युटी पार्लरच्या मालक सालियन यांना आला.सालियन यांनी त्वरित पोलिसांना फोन करून बोलावल्यानंतर दहा मिनिटांत मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. त्यांनी या दोघांना अटक केली. हनुमंत कावळे हे पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त खालीद कैसर यांच्याकडे चालक तर शेखर शिंदे हे वायरलेस ऑपरेटर असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे जेव्हा पोलीस फिर्यादीला घेऊन खालीद यांच्या कार्यालयात गेले तेव्हा फिर्यादीने २२ डिसेंबरला पैसे नेणाऱ्या दोन पोलिसांनाही ओळखले. पोलिसांनी मग तेथेच मधुकर खिल्लारे आणि दशरथ जानकर यांना अटक केली. खिल्लारे हासुद्धा खालीद यांच्या कार्यालयात चालक असल्याचे उघड झाले. या चौघांना चोरीच्या गुन्ह्य़ाखाली अटक करण्यात आली असून त्यांना ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.