मुंबई, पुणे, नागपूर  : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला मंगळवारी ग्राहकांनी सोने खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली. मंगळवारी सार्वजनिक सुट्टी आणि बाहेरच्या तापमानाचा पारा वाढण्याआधी सोने खरेदीसाठी सकाळीच सराफा दुकानांमध्ये खरेदीदारांनी हजेरी लावली.  तब्बल दोन वर्षांनंतर करोना निर्बंधमुक्त अक्षय्य तृतीया असल्याने राज्यभरातील नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. सोन्याची खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याचे सराफांनी सांगितले. मुंबई, पुणे, नागपूर आणि सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने खरेदी उत्तम झाली. 

चालू वर्षांत शुद्ध सोन्याचे दर प्रति दहाग्रॅमसाठी सुमारे ५४ हजारांवरून ५१ हजार ५१० रुपयांपर्यंत खाली आल्याने ग्राहकांकडून सोन्याची मागणी वाढली. तसेच नजीकच्या काळात लग्नादी मुहूर्ताच्या भरगच्च तारखांमुळे सध्याच्या कमी झालेल्या दराचा फायदा घेत सोने खरेदी करीत आहेत. तसेच जागतिक पातळीवर रशिया-युक्रेन युद्धामुळे चलनवाढ झाली आहे. शिवाय डॉलरपेक्षा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीवर सर्वाचा भर आहे,

सोन्याचे दर गेल्या काही महिन्यांमध्ये ५५ हजार ते ५८ हजार रुपये प्रतिदहा ग्रॅमवरून ५०,५०० रुपयांपर्यंत खाली आल्याने अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली. गेल्या १० ते १५ दिवसांपासून बाजारात सकारात्मक भावना कायम आहे. यामुळे देशभरात सुमारे २५ टनांपर्यंत सोने विक्री होण्याची अपेक्षा आहे, असे जीजेसीचे उपाध्यक्ष श्याम मेहरा यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीच्या अक्षय्यतृतीयेच्या तुलनेत यंदा सोने विक्रीत १० टक्के अधिक वाढ झाली आहे. यंदा ४० टक्के नागरिकांकडून नाणी, वळे आणि सोनाच्या तुकडय़ांची खरेदी केली. तर ६० टक्के ग्राहकांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. 

अमित मोडक , पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक-मुख्याधिकारी

यंदा ग्राहकांकडून सरासरी २५ हजार रुपयांची सोन्याची नाणी, वळीच्या स्वरूपात प्रातिनिधिक खरेदीपासून ते लग्नसराईसाठी सरासरी ५ लाख रुपयांहून अधिक मुल्याचे दागिने खरेदीचा कल दिसून येतो आहे.

सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  पीएनजी ज्वेलर्स

२० टन सोनेखरेदी..

  • कोरोनापूर्वकाळात म्हणजे २०१९ च्या अक्षय्य तृतीयेला देशभरात १८ टन सोन्याची खरेदी झाली होती. आताचा उत्साह पाहता हा आकडा २० टनांपर्यंत जाईल.
  • कारण आता सोन्याचे भावही स्थिर असून ते ५० हजारांच्या खाली जात नाहीत, हे सर्वाना कळले आहे. या दिवशी चांदीच्या नाण्यांची विक्रीही सोन्यापेक्षा साधारण तिप्पट होते.

जळगावात १२ कोटींची उलाढाल

जळगावमध्ये मंगळवारी दिवसअखेर १२ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह होता. ग्राहकांमधील सोने खरेदीचा उत्साह लग्नसराई संपेपर्यंत कायम राहील, अशी अपेक्षा सराफांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  करोनाच्या दोन वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच सुवर्ण बाजार असलेल्या जळगावात उत्साह संचारला असल्याची प्रतिक्रिया खुंडे ज्वेलर्सचे संतोष खुंडे यांनी दिली.

नागपुरातही सारखेच चित्र..

नागपूरसह विदर्भात सोने व वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. दोन्ही मिळून सुमारे या क्षेत्रात दीडशे कोटींची उलाढाल झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला.