जोखमीच्या गटाला संरक्षण देण्यासाठी मोहीम राबविण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : करोना प्रतिबंधक लशींचा मुबलक साठा आणि लसीकरणाच्या वाढत्या प्रमाणाबरोबर कमी झालेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, आरोग्य क्षेत्रासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिसरी लसमात्रा देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यापुढे करोनाचा मर्यादित प्रादुर्भाव झाला तरी तिसऱ्या लसमात्रेमुळे मृत्युदर आटोक्यात राहील, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

करोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात लशीद्वारे किंवा संसर्गानंतर तयार झालेली प्रतिपिंडे दोन ते तीन महिने टिकत असून, त्यानंतर त्यांचे प्रमाण हळूहळू कमी होते, असे विविध शोधपत्रिकांमधून सातत्याने मांडण्यात आले आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग झाल्यास जीवितहानी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आदी जोखमीच्या गटाला तिसरी लसमात्रा देण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून केली जात आहे. विशेषत: करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तिसऱ्या मात्रेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती; परंतु ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लशींचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध झाला होता. त्यामुळे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) तिसऱ्या मात्रेचा विचार अद्याप केला जाणार नाही, असे स्पष्ट  केले होते. मात्र, आता लशीचा साठा मुबलक असल्याने तिसरी मात्रा देण्यात यावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘‘सध्या लशीची मागणी तुलनेने कमी झाली असून, लसीकरण केंद्रांवर पूर्वीइतकी गर्दी दिसत नाही. लशींचा पुरेसा पुरवठा होत असल्याने केंद्रावर लससाठा शिल्लक राहत असल्याचे आढळते. त्यामुळे आता जोखमीच्या गटांसाठी तिसऱ्या मात्रेचे लसीकरण सुरू करायला हवे,’’ असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले. अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये विशेष गटांसाठी तिसऱ्या मात्रेचे लसीकरण सुरू झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्या करोनाचे उत्परिवर्तन फारसे होत नसल्याने तिसरी लाट आली तरी तिची तीव्रती कमी असण्याची शक्यता आहे. परंतु, सर्वत्र होणारी गर्दी पाहता करोनाचे छोटे-छोटे उद्रेक होत राहतील. त्यात मृत्युदर कमीत कमी राहण्यासाठी जोखमीच्या गटांना तिसरी मात्रा देणे गरजेचे आहे,’ असे डॉ. सुपे म्हणाले.

‘‘करोना अंतर्जन्य स्थितीमध्ये काही काळ आपल्याबरोबरच राहणार आहे. त्यामुळे करोनाचा धोका असलेल्या जोखमीच्या गटांना अधिक सुरक्षितता देणे आवश्यक आहे. ६० वर्षांवरील नागरिक किंवा आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लस घेऊन आता सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे त्यांच्यात आजाराविरोधातील प्रतिपिंडे आवश्यक प्रमाणात असण्याची शक्यता नाही. करोना प्रतिबंधक लशीमुळे करोनापासून संपूर्ण सुरक्षा प्राप्त होत नसली तरी आजाराची तीव्रता कमी होण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे या गटांच्या संरक्षणासाठी तिसरी मात्रा आवश्यक आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींची निर्मिती करोनाचे डेल्टा रूप येण्याआधी झालेली आहे. भविष्यात करोनापासून प्रतिबंध करण्यासाठी डेल्टासह नव्याने आलेल्या काही उत्परिवर्तनावरील चाचण्यांद्वारे तयार केलेल्या लशी अधिक फायदेशीर असतील. त्यामुळे तिसरी मात्रा ही नव्या लशीची असल्यास अधिक उपयुक्त असेल, असे मत डॉ. सुपे यांनी व्यक्त केले.

लशींमध्ये बदल

’सध्या वेगाने केले जाणारे लसीकरण आणि आतापर्यंत बाधित झालेल्यांचे प्रमाण लक्षात घेता आपल्याकडे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे, असे निश्चिातपणे म्हणता येईल.

’करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होईल. परंतु, काळानुसार विषाणूच्या स्वरूपात जसे बदल होतील, तसे लशींमध्येही बदल केले जातील.

’आगामी काळात आताच्या लशीपेक्षा अधिक प्रभावी लशी उपलब्ध होतील. उदाहरणार्थ, इन्फ्लुएन्झाची लस दर सहा महिन्यांनी बदलली जाते. करोनावरही पुढील काळात वेगवेगळ्या लशी येतील.

’स्वाइन फ्लूप्रमाणे करोनाची लसही दर काही काळाने घेण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे लसीकरणामध्ये येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतील, असे मत राज्याचे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.

निर्णय लवकरच…

पाश्चात्त्य देशांमध्ये ६० वर्षांवरील नागरिक, विविध आजारांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना तिसरी मात्रा दिली जात आहे. भारतात येत्या १५ दिवसांत याबाबतचे धोरण केंद्रीय आरोग्य विभागाकडून जाहीर केले जाईल. त्यामुळे आपल्याकडेही आता लवकरच या गटांसाठी तिसऱ्या मात्रेची मोहीम सुरू केली जाईल, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

साठ वर्षांवरील नागरिकांसह आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांच्या शरीरात पुरेशी प्रतिपिंडे नसतील. त्यामुळे या जोखमीच्या गटांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी तिसऱ्या लसमात्रेची गरज आहे.  – डॉ. शशांक जोशी, करोना कृती दलाचे सदस्य