scorecardresearch

करोनापूर्व काळाच्या तुलनेत रद्दीचा भाव दुप्पट!

जुन्या वृत्तपत्रांच्या रद्दीला सध्या मुंबईत प्रत्येक किलोमागे २५ ते २६ रुपये इतका भाव दिला जात आहे.

|| निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : जुनी वृत्तपत्रे, वह्या-पुस्तके आदींच्या रद्दीचा भाव गेल्या काही महिन्यात अचानक वधारला असून करोनापूर्व काळापेक्षाही तो दुप्पट झाला आहे. यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र कागद तयार करणाऱ्या कारखानदारांनी याबाबत ओरड सुरू केली आहे. रद्दीच्या रुपाने कच्चा माल पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांनी अचानकपणे दरात वाढ केल्याने रद्दीचा भाव वधारल्याचा त्यांचा दावा आहे.    

जुन्या वृत्तपत्रांच्या रद्दीला सध्या मुंबईत प्रत्येक किलोमागे २५ ते २६ रुपये इतका भाव दिला जात आहे. हा भाव प्रत्येक ठिकाणी एक ते दोन रुपयांनी कमी जास्त आहे. करोनापूर्व काळात हा दर १३ ते १६ रुपये असा होता. करोनाकाळात हा दर दहा रुपयांवर घसरला होता. पावसाळय़ात रद्दीचा दर तसा कमी असतो. तरीही दहा ते १२ रुपये होता. आता मात्र हा दर अचानकपणे दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे.

कागद उत्पादन गिरणीसाठी (पेपर मिल) लागणारी रद्दी अमेरिका तसेच युरोपमधून मोठय़ा प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध झाल्याने करोना काळात रद्दीचे भाव घसरले होते.  मात्र तो ओघ बंद झाल्यानंतर देशी रद्दीकडे हे कारखानदार वळले. आता रद्दी पुरवठादारांनी  दरात दुप्पट वाढ केल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे, असे   सूत्रांनी सांगितले. भारतात वापरण्यात येणाऱ्या कागदापैकी केवळ २० टक्के कागदच पुन्हा रद्दीच्या रूपाने पुनप्रक्रियेसाठी पोहोचतो, असे ‘इंडियन पेपर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणात नमूद केले आहे. याउलट विकसित देशात किमान ७५ टक्के कागद पुनप्रक्रियेसाठी संकलित केला जातो. परंतु त्यावर बंदी असल्याने अचानक भारतासारख्या देशांकडे परदेशी रद्दी मोठय़ा प्रमाणात आयात होऊ लागली. सध्या  आयातीचा दर वाढल्याने पेपर मिल पुन्हा देशी रद्दीकडे वळले आहेत. परंतु त्यांनी भाववाढ केल्यामुळे हे कारखानदार हैराण झाले आहेत.

मुंबईत दररोज एक हजार टन रद्दी निर्माण होते. या रद्दीला आता मागणी असल्यामुळे भाव वधारल्याचे रद्दी विक्रेता संघटनेचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection old newspapers textbooks the price of junk akp

ताज्या बातम्या