|| शैलजा तिवले

महात्मा फुले योजनेतील रुग्णालयांचा मोफत उपचारांस नकार

मुंबई : कठोर निर्बंधांमुळे विस्कटलेली घराची अर्थघडी आणि महागड्या उपचारांमुळे मेटाकुटीस आलेल्या करोना रुग्णांच्या कुटुंबांपुढे आता म्युकरमायकोसिस हा नवा शत्रू उभा राहिला आहे. या घातक बुरशीजन्य रोगावर उपचार करण्यासाठी २० ते ३० लाख रुपये कोठून उभे करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

करोना संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये घातक म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावरील उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सरकारने महात्मा फुले योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सोय केल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत आहेत.

पुण्यातील बाळासाहेब पाटेकर महिनाभरापूर्वी करोनाबाधित झाले. तीव्र लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. २८ दिवसांनंतर ते घरी परतले. मात्र रुग्णालयाचे पाच लाख रुपये शुल्क आणि रेमडेसिविरसह अन्य औषधांचा सुमारे दोन लाख खर्च यामुळे पाटेकर कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले. ‘माझा छपाईचा व्यवसाय आहे. करोना निर्बंधांमुळे व्यवसाय पूर्ण डबघाईला गेला आहे. त्यात वडिलांना करोनामुक्त करण्यासाठी सर्व बचत खर्च झाली. ते सुखरूप घरी आले. ते घरी आले त्याच दिवशी डोकेदुखी सुरू झाली. काही दिवसांत लक्षणे तीव्र झाली आणि म्युकरमायकोसिस असल्याचे निदान झाले. त्यांच्या औषधांसाठी १५ ते २० लाख रुपये लागतील, हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली,’ असे पाटेकर यांचा मुलगा सागर पाटेकर यांनी सांगितले. ‘वडिलांना सध्या रुग्णालयात दाखल केले असून दिवसाला सहा अशी १६८ एम्पोटेरेसिन इंजेक्शन द्यायची आहेत. याव्यतिरिक्त रुग्णालयीन खर्च वेगळा, त्यामुळे एकंदरीत २० लाखांपेक्षा अधिक जुळवाजुळव करायची आहे. माझ्या मित्रांनी लोकांना आवाहन करून सुमारे साडेचार लाख जमा करून दिले आहेत. बाकी रक्कम गोळा करण्यासाठी धावपळ सुरू आहे; परंतु इंजेक्शनही मिळत नाहीत. त्यांना आत्तापर्यंत एकाच दिवसाची इंजेक्शने मिळाली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व ठिकाणी प्रयत्न केले; परंतु काहीच हाती लागलेले नाही,’ असे हताश झालेल्या सागरने सांगितले.

अशी अनेक कुटुंबे याच यातनांमधून सध्या जात आहेत. मुंबईतील मीरा रोडच्या आल्ताजच्या आईलाही करोनाच्या उपचारासाठी सुमारे दोन लाख खर्च आला. तो भागवला नाही तोपर्यंत म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव झाला. ‘आठ दिवसांच्या उपचाराचे सुमारे सात लाख आम्ही कसेबसे भरू शकलो; परंतु अजूनही उपचार सुरू आहेत. घरी आल्यावर दहा दिवस सात हजार रुपयांप्रमाणे ७० हजार रुपयांची इंजेक्शन आणि दर तीन दिवसांनी १५ हजार रुपये नाकाच्या तपासणीचे असे आणखी लाखभर रुपये तरी खर्च आहेच. टाळेबंदीमध्ये माझी नोकरी गेली, आता नुकतीच दुसरी नोकरी मिळाली आहे. बचत होती ती तर आम्ही गमावलीच आहे; परंतु आता पुढील उपचारांसाठी पैसे जमा करण्यासाठी धडपड सुरू आहे,’ असे आल्ताजने सांगितले.

संगमनेरच्या संदीप आखाडेचीही हीच व्यथा आहे. करोनाचे सुमारे दीड लाखाचे शुल्क भरून सावरत नाही तोवर म्युकरमायकोसिस उद््भवला. नातेवाईकांकडून कर्ज, मित्रांच्या मदतीने आर्थिक मदत असे करत उपचारांचा सुमारे आठ लाख रुपये खर्च कसाबसा भागवला. आता पुढील उपचारांसाठी पैसे कसे उभे करायचे, असा प्रश्न संदीपची पत्नी सारिका आखाडे हिने उपस्थित केला.

 

कुटुंबीयांचे मदतीचे आवाहन

उपचारांचा खर्च झेपणारा नसल्याने आणि कोणतीच आशा न उरल्याने अखेर अनेक कुटुंबीयांनी, त्यांच्या मित्रपरिवारांनी लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. समाजमाध्यमांमध्ये असे अनेक संदेश सध्या फिरत आहेत.

 

रुग्णालयांचा नकार

म्युकरमायकोसिसचे उपचार महागडे असल्याने ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत केले जातील असे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही पुण्यातील अशा रुग्णालयांचा शोध सुरू केला. पुण्यातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये योजना सुरू असल्याचे समजले म्हणून आम्ही त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा या दोन्ही रुग्णालयांनी आम्ही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना या योजनेअंतर्गत उपचार देत नाही असे सांगत नकार दिला. नुसते जाहीर करून काय उपयोग जर सर्वसामान्यांना त्याचा उपयोगच होणार नसेल, असे पाटेकर कुटुंबीयांनी सांगितले.

 

महत्त्वाची माहिती...

योजनेअंतर्गत उपचारासाठी कोणतीही अडचण आल्यास किंवा तुमच्याजवळील म्युकरमायकोसिसचे मोफत उपचार देणाऱ्या योजनेतील रुग्णालयांची माहिती मिळविण्यासाठी १८००२३३२२०० या मदत क्रमांकावर संपर्क साधा.

अडचण काय?

करोनावरील उपचारांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना कित्येक कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. त्यात म्युकरमायकोसिसचे निदान झाल्यानंतर त्यावरील औषधांसाठी १५ ते २० लाख लाख रुपये कसे उभे करावे, हा प्रश्न या रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उभा राहिला आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी महात्मा फुले योजनेतील रुग्णालयांची नावे लवकरच जाहीर केली जातील.    – डॉ. सुधाकर शिंदे, अध्यक्ष, महात्मा फुले जनआरोग्य सोसायटी