मुंबई : अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन धमकावणाऱ्या टोळक्यांविरोधात सायबर पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली होती. त्याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणामागे एका चिनी कंपनीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींनी आतापर्यंत  सुमारे ३५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून गैरव्यवहारातील रक्कम परदेशात पाठवत होते. अटक आरोपींमध्ये विविध कंपन्यांच्या पाच संचालकांचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

याप्रकरणातील तक्रारदार यांनी एकूण १० अ‍ॅपवरून तीन लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांना ५० ते ६० मोबाइल क्रमांकावरून दूरध्वनी करून आरोपींनी धमकावले होते. कर्ज देणाऱ्या अ‍ॅपच्या वाढत्या प्रकरणांमुळे अखेर सायबर पोलिसांनी याप्रकरणी देशभर मोहिम राबवली. याप्रकरणी सर्वप्रथम आंध्र प्रदेशातून सुधाकर रेड्डी नावाच्या आरोपीला अटक केल्यानंतर उत्तर प्रदेशातून व बंगळूरूहून तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर मणिपूर, उत्तराखंड येथूनही तीन आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीवरून मालाड पश्चिम येथून स्नेह सोमानी (३०) याला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीने ९५ सिमकार्डसच्या माध्यमातून बनावट बँक खाती व बनावट कंपन्या उघडल्या असून त्याच्या बँक खात्यामध्ये तीन ते चार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय याप्रकरणी  लिएन्ग शँग या आरोपीलाही सायबर पोलिसांनी अटक केली. तो याप्रकरणातील चीनमधील मुख्य आरोपींच्या संपर्कात होता. त्याच्याकडे ८० जीबी डेटा मिळाला  असून त्यात सामान्य नागरिकांच्या अश्लील चित्रफिती असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय शँग हा खंडणीच्या रकमेचे बिट कॉईन मनीमध्ये रुपांतर करत होता, अशी माहितीही उघड झाली आहे.

याशिवाय, याप्रकरणी हरियाणातून संजय अरोरा नावाच्या आरोपीलाही सायबर पोलिसांनी अटक केली असून आरोरा बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने  सिमकार्ड मिळवून देण्यात आरोपींना मदत करत होता. त्याच्याकडून ३१ बनावट सिमकार्डस जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपीसाठी वसूलीचे काम करणाऱ्या टोळक्याचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अजयकुमार याला १० जुलैला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हा संपूर्ण गैरव्यवहार सुमारे ३५० कोटी रुपयांचा असल्याचा संशय असून आरोपी गैरव्यवहाराची रक्कम  क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतरित करून परदेशात पाठवत होते. अटक आरोपींमध्ये कर्ज देणाऱ्या विविध कंपन्यांच्या पाच संचालकांचाही समावेश आहे. 

चिनी नागरिकांच्या संपर्कातील अनुवादक महिेलाही जेरबंद

अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन आरोपी मोबाइलचा गोपनीय डेटा मिळवायचे. त्याच्या माध्यमातून पुढे कर्ज घेणाऱ्याला धमकावले जायचे. आरोपी हे सर्व एका ‘ऑमलेट टेक्नॉलॉजीज’ नावाच्या कंपनीसाठी काम करत होते, अशी माहिती निष्पन्न झाली आहे. या कंपनीतील चिनी आरोपींशी  नैनितालमधील प्रियांशी नावाची महिला संवाद साधायची. तिच्या कंपनीत १३० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचीही माहिती मिळाली आहे.