हकालपट्टीविरोधातील लढाईसाठी सज्ज

टाटा सन्स तसेच तिच्या अनेक कंपन्यांमध्येही टाटा ट्रस्ट व तिचे विश्वस्त यांचा वाढता हस्तक्षेप रोखल्यानेच सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी केली असल्याचा दावा मिस्त्री यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे. टाटा समूहाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असताना दीडशे वर्षे जुना टाटा समूह, तिचे विश्वस्त, कंपन्यांचे नियम अशा सर्वामध्येच कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता मिस्त्री समर्थकांकडून मांडण्यात आली आहे.

टाटा सन्स संचालक अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची २४ ऑक्टोबरला हकालपट्टी करण्यात आल्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी समूहातील विविध कंपन्यांच्या विशेष सर्वसाधारण सभा येत्या आठवडय़ापासून सुरू होत आहेत. या पार्शवभूमीवर भागधारकांसमोर आपली बाजू भक्कम करण्याच्या प्रयत्नात मिस्त्री आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिस्त्री हे वैयक्तिक पातळीवर आपल्या बाजूने   समर्थन मिळविण्यासाठी जात असल्याचे मानले जात आहे.

मिस्त्री यांच्या निकटवर्तीयांनी या बाबत सांगितले की, मिस्त्री यांचे व टाटा सन्सचे काही संचालक यांनी मिस्त्रींबद्दलचे मत रतन टाटा यांच्या मनात कलुषित केल्यानेच ते एकटे पडल्याचे समर्थनही करण्यात आले आहे.