मुंबई : दोन वर्षे करोनाच्या निर्बंधांनंतर यंदा मुंबई आणि परिसरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. करोनासह वाढणाऱ्या इतर साथीच्या आजारांची भीती बाजूला सारून रस्त्यांवर नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. राज्यातील राजकीय घडामोडी, येऊ घातलेल्या निवडणुका यामुळे राजकीय चढोओढीलाही ऊत आला होता.

राजकीय पक्षांनी दहीहंडीची संधी साधत आपले शक्तीप्रदर्शन केलेच पण दहीहंडी पथकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. हात मोकळा सोडून पक्षांनी पथकांसाठी खर्च करण्याची तयारी दाखवली. गोपाळकाल्याच्या दिवशी शुक्रवारी सकाळी करोनाचे संकट निवारण्याचे गाऱ्हाणे घालून अनेक गोविंदा पथकांनी आपापल्या विभागातील मानाच्या दहीहंडय़ा फोडल्या.  आपापल्या विभागातील मानाच्या दहीहंडय़ा फोडून मुंबईतील गोविंदा पथके ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.

सकाळच्या पहिल्या सत्रातच जोगेश्वरीचे ‘जय जवान पथक’ आणि ठाण्यातील ‘कोकणचा राजा’ पथकाने भांडुप व्हीलेज परिसरात नऊ थरांची विक्रमी सलामी दिली. ठिकठिकाणी लहान-मोठी पथके दहीहंडय़ा फोडून बिदागी मिळविण्यात व्यग्र होती.

आयडियल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एलआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने दादर पश्चिम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावून अनेक गोविंदा पथकांनी सलामी दिली. त्याचबरोबर कुलाबा, चिराबाजार, गिरगाव, भायखळा, वरळी, लालबाग, परळ, शिवडी आदी भागातील कच्छी बाजा, बेन्जो, कोंबडीबाजाच्या तालावर गोविंदा थिरकत होते. काही गोविंदा पथकांनी पौराणिक कथा, सामाजिक प्रश्न, राजकीय अस्थिरता, तसेच आरोग्यावियक संदेश देणारे चित्ररथ साकारले होते.

शिवराय-अफजल भेटीचे थरारक दृश्य सादर

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दादर येथील आयडियल गल्लीमध्ये उभारण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाने उत्तम कामगिरी केली. गोविंदानी तीन थर उभे करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा क्षण, शिवरायांनी अफजल खानचा कोथळा काढल्याचे दृश्य सादर केला. हे गोविंदा पथक दरवर्षी वेगवेगळय़ा संकल्पना साकारते. पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनात्मक संदेश पथकाद्वारे देतो, असे शिवसागर गोविंदा पथकाचे अध्यक्ष प्रतीक बोभाटे यांनी सांगितले.

आर्थिक मदतीचा स्वीकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांच्या गटात सहभागी झालेल्या भायखळा मतदारसंघातील आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही माझगाव आणि आसपासच्या परिसरात शिवसेनेचा दबदबा आहे. त्यामुळे येथील गोविंदा पथकांनी बंडखोर आमदारांची छायाचित्रे असलेले टी-शर्ट नाकारले आणि आर्थिक मदत स्वीकारली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर या परिसरातील मोठय़ा गोविंदा पथकामध्ये उभी फूट पडली होती. मात्र त्यावेळीही शिवसेना अथवा मनसेचे टी-शर्ट वापरायचे नाहीत, असा निर्णय या पथकाने घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी झाली. राजकीय शिक्का पडण्याऐवजी मंडळाचे अस्तित्व कायम राहावे याची पथकांकडून काळजी घेण्यात आल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दृष्टीहीन गोविंदा पथकाचाही दहीकाला उत्सव

दादरमधील आयडियल गल्ली येथे दृष्टीहीन आणि दिव्यांग मुलांनी दहीहंडीला सलामी देऊन दहीकालाचा उत्सव साजरा केला. नयन दृष्टीहीन गोविंदा महिला पथकाने यंदा दादरमध्ये तीन थर रचून दहिहंडीला सलामी दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित केलेल्या आयडियल पर्यावरणपूरक दहीहंडीत दिव्यांगांना ही थर रचण्यासाठी सहभाग घेतला.

नेत्यांचे टी-शर्ट नकोत

राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे विविध राजकीय पक्षांमधील नेते मंडळींनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शनाची संधी साधली. भाजप, शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाने मोठय़ा प्रमाणावर मुख्यमंत्री आणि आपली छबी असलेली टी-शर्ट बनवून निरनिराळय़ा विभागांतील पथकांकडे रवाना करण्यात आली होती. मात्र काही पथकांनी ती नाकारली तर काहींनी ती स्वीकारली. राजकीय नेत्यांकडून टी-शर्टऐवजी रोख रक्कम स्वीकारून पथकांनी स्वत:चे टी-शर्ट तयार करून घेतले.

राजकीय चढाओढीचे थर..

दरवर्षी शिवसेनेच्यावतीने वरळीच्या जांबोरी मैदानात आयोजित केली जाणारी दहीहंडी यावर्षी नसल्यामुळे भाजपने या ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेनेने आपली दहीहंडी श्रीराम मिल चौक येथे आयोजित केली होती. जांबोरी मैदानाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. मैदानाच्या वापराबाबत येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे याठिकाणी यंदा दहीहंडी आयोजित करण्यात आले नव्हते. शिवडी नाका येथे शिवसेना शाखा क्रमांक २०६ तर्फे निवांत घेरडे चौकात या दहिकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार वाजेपर्यंत या ठिकाणी १२४ गोविंदा पथकांनी उपस्थिती दर्शवून मानवी मनोरे रचले, अशी माहिती आयोजक माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.