ऑनलाइन फूड डिलेव्हरी अॅप असणाऱ्या झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयने पार्सलमधील अन्नपदार्थ खाऊन तेच पार्सल परत टेप करुन ठेवल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. याप्रकरणाचे नंतर अनेक पडसाद उमटले असून कंपनीला नेटकऱ्यांनी चांगले ट्रोल केले आहे. अनेकांनी या डिलेव्हरी बॉइजच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हच उपस्थित केले आहे. एकीकडे असे चित्र असतानाच दुसरीकडे अशाच एका डिलेव्हरी बॉयने आपला स्वत:चा जीव धोक्यात टाकून १० जणांचे प्राण वाचलवल्याची घटना समोर आली आहे. अंधेरीतील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीतून स्वीगीच्या डिलेव्हरी बॉयने दहा जणांची सुखरुप सुटका केली.

सिद्धू हुमनाबाडे असे या २० वर्षीय डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी हॉस्पीटलमध्ये आग लागल्याची घटना घडली तेव्हा सिद्धू तिथेच होता. आग लागल्याचे समजताच त्याने हॉस्पीटलमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी धाव घेतली. सिद्धूने अश्निशामक दलाच्या जवानांनी लावलेल्या शिडीवर चढून पाचव्या मजल्याची काचेची खिडकी फोटडली आणि आतमध्ये प्रवेश केला.

सिद्धू रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर खिडकी तोडून आत गेला तेव्हा तिथे धुराचे सम्राज्य होते. धुरामुळे काही दिसत नसताना तसेच श्वास घेण्यास त्रास होत असतनाही सिद्धूने तेथील दहा लोकांना सुखरुपपणे बाहेर काढले. या संपूर्ण प्रकाराबद्दल बोलताना सिद्धूने टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली. मी खिडकीला लावण्यात आलेल्या शिड्यांवरून अडकलेल्यांना उतरण्यास मदत करत होतो. मात्र दोघांचा तोल गेल्याने ते दोघे माझ्या डोळ्यासमोरच खाली पडले. पण मी त्यावेळी त्यांना पडण्यापासून वाचवू शकलो नसल्याची खंत सिद्धूने व्यक्त केली. पडलेल्यांपैकी एकजण वयोवृद्ध महिला होती. तिला मी शिडीवर जाण्यासाठी मदत केली मात्र तोल गेल्याने ती खाली पडल्याची माहिती सिद्धूने दिली.

स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांची मदत करण्यासाठी शिडीवर चढताना भिती वाटली नाही का या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धू म्हणतो, ‘अडचणींच्या वेळी इतरांची मदत करायला हवी. मदत करताना घाबरण्याची गरज नसते.’ आगीमधून अनेकांना वाचवण्यासाठी सिद्धू अग्निशामक दलाच्या जवानांबरोबर तीन तासाहून अधिक काळ काम करत होता. अखेर त्याला छातीत दुखू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

सिद्धूचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो ऐरोलीचा आहे. काही महिन्यांपूर्वीच स्वीगीचा डिलेव्हरी बॉय म्हणून काम करण्यासाठी अंधेरीमध्ये रहायला आला आहे. अशाप्रकारे जीवावर उदार होऊन इतरांना मदत करण्याची सिद्धूची पहिलीच वेळ नाही. तो नेहमीच अशाप्रकारे इतरांना मदत करत असतो असं त्याच्या भावाने सांगितले.

जखमींना भेट दण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री दिपक सावंत हे रुग्णालयात आले असता त्यांनीही सिद्धूच्या या धाडसाचे कौतूक केले.