मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या अतिरेकी अजमल कसाबने केली नाही, असे वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. काँग्रेसशी आघाडी केलेले उद्धव ठाकरे या विषयावर अद्यापही गप्प आहेत. वडेट्टीवार यांच्या आरोपांशी ठाकरे सहमत आहेत का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.

मुंबईवरील हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात अॅड. उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र वडेट्टीवार हे निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा >>> पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट : सोमय्या शाळेने मुख्याध्यापिकेला नोकरीवरून काढले

पालघर येथील शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ठाकरे आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचा नेता पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये करीत असताना ठाकरे मात्र मूग गिळून गप्प आहेत. मुंबईवरील अतिरेकी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता आणि करकरे यांचे निधन अजमल कसाबच्या अत्याधुनिक मशीनगनमधील गोळी लागल्यानेच झाल्याचे न्यायालयातही सिद्ध झाले असताना वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.