हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांचे बंधू आणि अभय देओलचे वडील अजित सिंग देओल यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. शनिवारी सकाळी जुहूतील पवन हंस येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्या वेळी चित्रपटसृष्टीतील अनेक जण उपस्थित होते.
अजित सिंग देओल हे गेले कित्येक महिने आजारी होते. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात होते. महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांना पाल्र्यातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, ते कोणत्याही उपचारांना दाद देत नसल्याने अखेर त्यांना घरी आणण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता जुहू येथील त्यांच्या निवासस्थानीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सत्तरच्या दशकात अजित सिंग देओल हे पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चांगले अभिनेते म्हणून परिचित होते. त्यांनी ‘खोटे सिक्के’, ‘मेहेरबानी’ आणि अभिनेता बॉबी देओलच्या पदार्पणातील चित्रपट ‘बरसात’ या चित्रपटांतून काम केले होते.