डीजे नसल्याने ढोलपथकांना मागणी

ध्वनिक्षेपकाची सुविधा पुरविणाऱ्या व्यावसायिकांच्या मूकदिनामुळे दहीहंडी उत्सवात निर्माण झालेली शांतता मंगळवारी बॅण्ड व बँजोच्या दणदणाटाने मोडून काढली. डीजे उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी ढोलपथकांनाही ‘सुपारी’ देण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच या वाद्यपथकांनी दहीहंडीत रग्गड कमाई केली.

दादर, परळ, वरळीसह मुंबईतील बहुतांश दहीहंडी आयोजकांनी यंदाच्या उत्सवासाठी बँजोपथकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे दहीहंडी फोडल्यानंतर ‘डीजे’च्या तालावर नाचणारे गोविंदा यंदा मात्र ‘बँजो’च्या सुरावटीवर थिरकत होते. आवाजाबाबत न्यायालयाने घातलेली ७२ डेसिबलपर्यंतची मर्यादा शिथिल करावी तसेच पोलिसांनी कारवाई करू नये, अशा मागण्यांवरून डीजे व्यावसायिकांच्या ‘पाला’ या संघटनेने मंगळवारी मूकदिन जाहीर केला होता. या संघटनेचे सात हजार सभासद त्यामुळे यंदा उत्सवात उतरलेच नाहीत. त्यामुळे दहीहंडीचा थरार विनाआवाजी राहील, अशी भीती होती. परंतु, ती कसर ढोल तसेच बँजोपथकांनी भरून काढली.

प्रमुख दहीहंडी आयोजक सोडल्यास सगळ्याच आयोजकांनी बँजोपथकांना बोलावल्यामुळे त्यांचा भाव वधारला होता. एरवीपेक्षा आयोजकांकडून अधिक पैसे घेत बँजोपथकातील मंडळी वादन करीत होती. ‘उत्सव काळात तीन तास वाजवण्यासाठी आम्ही साधारण पंधरा हजार घेतो. मात्र यंदा मागणी वाढल्याने आम्ही दहीहंडी आयोजकांकडून २० ते २२ हजार रुपये घेतले,’ अशी माहिती साईराम बँजोपथकाचे चंदन कोळी यांनी दिली.

दादर येथील सगळ्याच राजकीय पक्षांच्या दहीहंडीत बँजोपथक दिसत होते. दादर फूल मार्केट येथे मनसेतर्फे आयोजित केलेल्या दहीहंडीत गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी बँजोपथकाला बोलविण्यात आले होते. एकही डीजेवाला उपलब्ध न झाल्याने आणि पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी यावर्षी बँजोपथकाला बोलावण्यात आल्याचे मनसेचे शाखाध्यक्ष आणि आयोजक अभिषेक गुप्ता यांनी सांगितले