शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (१ एप्रिल) केंद्रीय तपास संस्थांच्या महाराष्ट्रातील कारवाईच्या मुद्द्यावर गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच या कारवायांच्या विरोधात कोणी ‘आहिस्ते कदम’ भूमिका घेत असेल तर ते स्वतःसाठी फाशीचा दोर वळत असल्याचा इशारा दिला. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात दिलीप वळसे पाटलांनी संजय राऊत यांची भावना बरोबर असल्याचं म्हटलं.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. त्याबाबत आमच्या विभागाकडून काही कमतरता होत असतील जरूर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू.”

“नाराजी प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आधीच खुलासा केला आहे. अशाप्रकारची कुठलीही नाराजी नाही. नाराजी असण्याचा प्रश्न नाही. आम्ही परस्परांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय घेत असतो,” असंही वळसे पाटलांनी नमूद केलं.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

संजय राऊत म्हणाले होते, “सतीश उकेंवर झालेल्या कारवाईवर काही म्हणणं नाही पण त्यात केद्रीय तपास यंत्रणांचा हस्तेक्षप आल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज्याच्या पोलिसांना योग्य सूचना, मार्गदर्शन मिळालं तर काम होऊ शकेल. गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.”

हेही वाचा : “उद्या जर संघर्ष….”, नाना पटोलेंच्या वकिलाला ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊतांचा इशारा; राष्ट्रवादीला म्हणाले “गांभीर्याने लक्ष द्या”

“केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत हे गृहखात्यावरील आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, तपास यंत्रणा ज्यांच्या अख्त्यारित आहे त्यांनी यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कोणी ‘आहिस्ते कदम’ भूमिका घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. गृहखात्याला दमदार पावलं टाकावी लागतील, अन्यथा तुमच्यासाठी रोज एक नवा खड्डा खणाल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला होता.