शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली असून, शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी चर्चा केली. या चर्चेतून अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसला, तरी ८० टक्क्यांपर्यंत सहमती झाली असल्याचे फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला सत्तेत एक तृतियांश प्रतिनिधित्व हवे आहे. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या वाटाघाटी सुरू आहेत.
शिवसेना नेते सुभाष देसाई, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनी रविवारी रात्री ‘वर्षा’वर जाऊन भाजप नेत्यांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह, भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य विनोद तावडे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.
शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद, गृह खात्यासह १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात भाजपकडे असलेली खाती मागितली आहेत. उपमुख्यमंत्रिपद आणि गृह खात्यावर तडजोड केली तर महसूलसारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला हवी आहेत. शिवसेनेच्या मागण्या लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री व भाजप नेते धर्मेद्र प्रधान यांनी अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली आणि शिवसेनेशी पुढील चर्चा न करता मुंबईतून ते रवाना झाले. त्यामुळे रविवारी दुपारी या दोन्ही पक्षांमधील चर्चा थांबल्याचे चित्र होते.
भाजप शिवसेनेची फसवणूक करीत असून त्यांची शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा विसंवाद निर्माण झाल्याचे दिसू लागले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केली.