नाटय़परिषद व यशवंत नाटय़ मंदिर यांची इमारत उभी राहून काही वर्षे लोटल्यानंतर आता या इमारतीच्या उभारणीचे श्रेय नेमके कोणाचे, या वादाला तोंड फुटले आहे. नाटय़परिषदेच्या निवडणुकीत ‘उत्स्फूर्त पॅनल’तर्फे उभ्या राहिलेल्या मोहन जोशी यांनी आपल्या प्रचारपत्रकात ‘नाटय़परिषदेची इमारत व यशवंत नाटय़मंदिर उभारले’ असा उल्लेख केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी काढलेल्या पत्रकात ‘नाटय़परिषदेची इमारत व यशवंत नाटय़मंदिर उभारले’ असे म्हटले आहे. मात्र नाटय़परिषदेच्या इमारतीच्या उभारणीसाठी अनेकांचे हातभार लागले आहेत. त्यामुळे मोहन जोशी यांनी एकटय़ाने त्याचे श्रेय घेणे चूक आहे, असे अनेक रंगकर्मीचे म्हणणे आहे. किंबहुना मोहन जोशी यांच्या आधीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांच्या कार्यकाळात नाटय़परिषदेच्या इमारतीचे ६५ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले होते, असेही अनेकांचे म्हणणे आहे.मोहन जोशी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली त्या वेळी हे काम ६५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले होते. त्यामुळे जोशी यांनी या कामाचे श्रेय एकटय़ाने घेणे योग्य नाही, असे एका बडय़ा नाटय़निर्मात्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
हा वाद निवडणुकीच्या तोंडावर काढण्याचे आपले प्रयोजन नाही. मात्र जोशींनी आपल्या पत्रकात असा उल्लेख करणे चूक आहे, असे त्याने सांगितले.