पावसाळी आजारांची बाधा

गेल्या वर्षी पावसाळ्यात करोनामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण फार कमी नोंदले होते.

लेप्टो, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीहून अधिक वाढ; स्वाइन फ्लूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबई:  मुंबईत जुलैमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जूनच्या तुलनेत जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. तसेच स्वाइन फ्लूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात करोनामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण फार कमी नोंदले होते. परंतु यावर्षी जुलैमध्ये सलग झालेल्या पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. या साचलेल्या पाण्यामधून प्रवास केल्यामुळे ३७ जणांना लेप्टोची बाधा झाली आहे. या वर्षभरात जुलैपर्यंत लेप्टोस्पायरोसिसचे ९६ रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जुलैमध्ये १२ वरून ४८ वर गेली आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णाची संख्या ही आता वाढायला सुरुवात झाली असून जूनमध्ये केवळ पाच रुग्ण होते. जुलैमध्ये या रुग्णांची संख्या २१ वर गेली आहे. दूषित पाणीपुरवठय़ामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे २९४ रुग्ण आढळून आले आहेत.

दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. यंदाही ती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

हिवतापाचे ५५७ रुग्ण

पावसानंतर ठिकठिकाणी साचून राहिलेल्या पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून यामुळे हिवतापाच्या रुग्णसंख्येतही जूनच्या तुलनेत वाढ झाली आहे. जुलैमध्ये हिवतापाचे ५५७ रुग्ण आढळले आहेत.

डेंग्यू होऊ नये यासाठी..

तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, पोटदुखी, मळमळ, भूक न लागणे, अशक्तपणा, सर्व अंगावर पुरळ ही डेंग्यूची लक्षणे आहेत. वरील लक्षणे दिसून आल्यास औषधविक्रेत्याकडून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजारपणात भरपूर प्रमाणात पाणी प्यावे आणि शक्यतो आराम करावा. अंग पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे घालावेत. डासांपासून संरक्षण करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. थर्माकोलची खोकी, पत्र्याचे रिकामे डबे, नारळाच्या करवंटय़ा इत्यादी वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी.

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही वाढ

जुलैमध्ये मुंबईत अनेक ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा झाला. परिणामी दूषित पाण्यामुळे शहरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या महिनाभरात १८० वरून २९४ वर गेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disruption of rainy season diseases ssh

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या