११ वर्षांतील उपग्रह छायाचित्रांच्या आधारे कारवाई

मुंबईतील कांदळवने असलेल्या जमिनींवर खुलेआम अतिक्रमण करून मोठमोठे इमले बांधणाऱ्यांना दणका देण्याचा निर्णय उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गेल्या ११ वर्षांत उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेली छायाचित्रे आणि नकाशे यांचा अभ्यास करून कांदळवनांवर उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

२००५ ते २०१६ या वर्षांत उपग्रहाद्वारे मुंबई उपनगरातील विविध भागांची काढण्यात आलेली छायाचित्रे व नकाशे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने मिळवले आहेत. या छायाचित्रांवरून २००५ साली एखाद्या भागात असलेली कांदवळने आणि २०१६ मध्ये त्यांची असलेली स्थिती कळणार आहे. यावरून सध्या कुठे आणि किती ठिकाणी कांदळवनांवर अतिक्रमण झाले आहे याची माहिती अहवालाद्वारे सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आल्याचे उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्पष्ट केले.

मुंबई उपनगरात सध्या मोठय़ा प्रमाणात कांदळवनांवर अतिक्रमणे होत असून यावरून मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला वारंवार फटकारले आहे. त्यामुळे ठोस कारवाई करण्यासाठी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. सध्या मुंबई उपनगरात १८०० हेक्टर परिसरातील खाजगी जागेत कांदळवने आहेत. यात गोराई, जुहू, मालाड, मढ, ओशिवरा, वर्सोवा, चारकोप, वांद्रे, कांदिवली, मार्वे, मालवणी, गोरेगाव, कांजूरमार्ग यांसह एकूण २१ गावांचा समावेश आहे.

‘उपनगरातील प्रत्येक गावाचे २००५ ते २०१६ दरम्यानचे प्रत्येक वर्षीचे एक छायाचित्र व नकाशा जिल्हाधिकारी कार्यालयाने मिळविले आहे. त्यामुळे दरवर्षी या कांदळवनांवर कोणते बदल झाले, याची माहिती मिळणार आहे. ही छायाचित्रे संबंधित तहसीलदारांना पाठवण्यात आली असून त्यांचा व नकाशांचा अभ्यास करून कुठे व किती अतिक्रमणे झाली आहेत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,’ अशी माहिती दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. हा अहवाल सादर करताना जेथे कांदळवने नसतील अशा भागात जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. उपनगरातील गावांचे उपग्रहामार्फत नकाशे व छायाचित्रे मिळवून त्यावरून त्याची तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्याच्या या तपासणीवरून २००५ नंतर कुठे आणि कशा स्वरूपाचे अतिक्रमण झाले आहे हे कळून येईल. त्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भूमाफियांचे पितळ उघडे पडणार?

मुंबई उपनगरातील १८०० हेक्टरवर पसरलेल्या खाजगी जागांमध्ये कांदळवने आहेत. या कांदळवनांवर मात्र गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टय़ा, भूमाफिया व बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे उघड झाले आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वेक्षणानंतर कोणी-कोणी अतिक्रमण केले ही बाब उघड होणार आहे. यात मुंबईतील अनेक धनाढय़ बांधकाम व्यावसायिकांची व भूमाफियांची नावेदेखील उघड होण्याची शक्यता आहे.

चारकोप, आंबिवली, दहीसर, एरंगल, गोराई या ठिकाणच्या उपग्रहाच्या छायाचित्रांवरून येथे मोठय़ा प्रमाणात कांदळवनांची कत्तल झाल्याचे दिसते. मात्र, याबाबतची अंतिम माहिती ही तहसीलदारांकडून आलेल्या अहवालातून स्पष्ट होईल.

– दीपेंद्रसिंह कुशवाह, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी