गोरेगाव येथील पालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवासी खोलीत एका २४ वर्षीय डॉक्टर तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. सय्यद मेहजबीन मोईनोउद्दीन नसरीन असे या डॉक्टर तरुणीचे नाव आहे.

सय्यद मेहजबीन ही मूळची घाटकोपर येथील रहिवासी आहे. तिचे कुटुंब घाटकोपर एनएनएस रोडवरील लकी मेडिकलजवळील आझाद नगरमध्ये राहतात. आई, वडील, चार बहीण, एक भाऊ  असे तिचे कुटुंब आहे. तिच्या वडिलांचा भंगाराचा व्यवसाय असून दोन मधल्या बहिणी पेशाने वकील आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने मेहजबीनला डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला पुढील शिक्षणासाठी वैद्यकीय शाखेला पाठवले. नुकतीच तिने डी. वाय. पाटील येथून एमबीबीएसची पदवी घेतली होती आणि त्यानंतर सिद्धार्थ रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून ती इंटर्नशिप करत होती. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत तिने आपल्या कामाने इतर डॉक्टरांवर स्वत:च्या कामाचा ठसा उमटवला होता. बुधवारी रात्रपाळी करून ती नेहमीप्रमाणे सिद्धार्थ रुग्णालयातील पाचव्या मजल्यावरील डॉक्टरांसाठी असलेल्या तिच्या चौदा नंबरच्या खोलीत गेली. सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत ती खोलीबाहेर न आल्याने तिच्या मैत्रिणीने तिथे जाऊन पाहणी केली असता तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर तिला तातडीने सिद्धार्थ रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथे कोणतेही पत्र सापडले नाही. तसेच तिच्या पालकांनीदेखील अद्याप तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. आम्ही याविरोधात अपघाती गुन्ह्य़ाची नोंद केल्याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण नलावडे यांनी दिली. तिला एक तरुण त्रास देत होता. त्यातूनच तिने आत्महत्या केली का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.