उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या ‘अँटिलिया’ इमारतीवर कारवाईचे संकेत अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी दिले. वक्फ बोर्डाच्या राज्यातील सुमारे ८० टक्के जमिनी बेकायदेशीरपणे लीज, मालकीहक्काने हस्तांतरित करण्यात आल्या असून त्या ताब्यात घेण्यासाठी विधिमंडळात कायदा करण्यात येईल, अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधानसभेत केली.
यापुढे वक्फ बोर्डाच्या जमिनी हस्तांतरणास बंदी घालण्यात येत असून बेकायदेशीरपणे जमीन हस्तांतरणात माजी मंत्री तारिक अन्वर, राजेंद्र शिंगणे आदींचा समावेश असल्याची माहिती खडसे यांनी दिली. अल्पसंख्याक विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांदरम्यान झालेल्या चर्चेच्या वेळी वक्फ बोर्डाच्या जमिनी बेकायदेशीरपणे विकल्याचा किंवा हस्तांतरित केल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. राज्यात सुमारे एक लाख एकर वक्फ बोर्डाच्या जमिनी असून त्यापैकी ८० टक्के जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्यावर इमारती, शासकीय कार्यालयेही असून त्याबाबत निर्णय घेण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. दरम्यान, अल्पसंख्याकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देणार असल्याचे सांगून खडसे यांनी अल्पसंख्याकांच्या मुलांसाठीची शिष्यवृत्ती, वसतिगृहे आदींबाबत माहिती दिली.