अकरावीच्या रिक्त जागांचे तपशील २० डिसेंबरला, तर पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. जवळपास ७० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून, तीन फेऱ्यांमधील प्रवेशाच्या अटीतटीनंतर आता विशेष फेरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

अकरावीच्या तीन नियमित फेऱ्यांनंतर आता विशेष प्रवेश फेऱ्या सुरू होणार आहेत. सत्तर हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी या फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दुसरी विशेष फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख १६ हजार ११९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यंदा वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी अटीतटीची स्पर्धा आहे. तिसऱ्या फेरीसाठी वाणिज्य शाखेच्या ६३ हजार ३५९ जागा होत्या. त्यासाठी ७४ हजार ५३६ अर्ज आले होते. त्यातील २८ हजार ८३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले होते. त्यानुसार उपलब्ध जागांपेक्षा जवळपास दहा हजार अर्ज जास्त आहेत. विशेष फेरीसाठी कोटय़ातील शिल्लक जागा समाविष्ट होणार आहेत. मात्र, तरीही उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशोत्सुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

विशेष फेरी अशी..

* २० डिसेंबर (सकाळी १० वाजता) : रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार (महाविद्यालयांनी प्रत्यर्पित केलेल्या सर्व कोटय़ांतील जागांसह एकूण रिक्त जागा)

* २० डिसेंबर (सकाळी १० वाजल्यापासून) ते २२ डिसेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) : प्रवेश अर्जात आवश्यक ते बदल करणे आणि पसंतीक्रम नोंदविणे.

* २४ डिसेंबर (सकाळी ११ वाजता) : प्रवेश यादी जाहीर करणे.

* २४ डिसेंबर (सकाळी ११ वाजता) ते २६ डिसेंबर (सायंकाळी ५ वाजता) : मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे

* २७ डिसेंबर : विशेष फेरीनंतर रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.